डेक्कन पोलीस ठाण्यात हॉटेल मालकाचे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2023 10:02 AM2023-07-17T10:02:01+5:302023-07-17T10:02:13+5:30
आरोपीने डेक्कन पोलीस ठाण्यातही फिर्यादी श्रीहरी बहिरट यांना 'काय करायचे ते कर' असे एकेरी भाषेत बोलून त्यांचा हात झटकला.
किरण शिंदे
पुणे: रात्री उशिरापर्यंत सुरू असलेले हॉटेल बंद करण्यासाठी सांगितल्याने हॉटेल मालकाने पोलीस अधिकाऱ्यासोबतच हुज्जत घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. डेक्कन पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी रामचंद्र बहिरट (वय 53, युनिट 3) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार हॉटेल मालक सचिन हरिभाऊ भगरे (वय 33, नारायण पेठ, कबीर बाग, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. डेक्कन पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी श्रीहरी बहिरट हे 16 जुलै च्या रात्री विश्रामबाग विभागात ड्युटीवर होते. यावेळी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्यांना डेक्कन येथील नदीपात्रात हॉटेल सद्गुरु हे सुरू असल्याचे दिसले. त्यांनी हॉटेल मालक सचिन भगरे यांना बंद करण्यास सांगितले असता त्याने फिर्यादी सोबत हुज्जत घातली. त्यामुळे पुढील कारवाईसाठी त्याला डेक्कन पोलीस स्टेशन येथे नेले होते.
त्यानंतर आरोपीने डेक्कन पोलीस ठाण्यातही फिर्यादी श्रीहरी बहिरट यांना 'काय करायचे ते कर' असे एकेरी भाषेत बोलून त्यांचा हात झटकला. तसेच त्या ठिकाणी असणाऱ्या पोलीस अंमलदाराला ढकलून देऊन सरकारी कामात अडथळा आणला. डेक्कन पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक साळुंखे अधिक तपास करत आहेत.