परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना स्वखर्चाने हॉटेल क्वारंटाईन बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:08 AM2020-12-23T04:08:54+5:302020-12-23T04:08:54+5:30
पुणे : परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना स्वखर्चाने हॉटेलात संस्थात्मक क्वारंटाईन होणे, पुणे महापालिकेने बंधनकारक केले आहे. सात दिवसांच्या काळात त्यांचा ...
पुणे : परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना स्वखर्चाने हॉटेलात संस्थात्मक क्वारंटाईन होणे, पुणे महापालिकेने बंधनकारक केले आहे. सात दिवसांच्या काळात त्यांचा पासपोर्ट जमा करुन राहणार असून, कोरोना चाचणीही प्रवाशांना स्वत:च्या खर्चाने करावी लागणार आहे.
इंग्लंडमध्ये कोरोना विषाणुचा नवीन प्रकार सापडला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून इंग्लंडमधून येणाºया सर्व विमानसेवा रद्द करण्यात आल्या आहेत. तर राज्य शासनाच्या निर्देषानुसार आखाती आणि युरोपियन देशांतून येणाºया प्रवाशांसाठी पुणे महापालिकेकडून मंगळवारी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
यात एखाद्या प्रवाशाला कोरोनाची लक्षणे आढळून आली तर त्यास तातडीने महापालिकेच्या नायडू रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. तर इतर प्रवाशांना स्वत:च्या खर्चाने विमानतळाच्याजवळील हॉटेलमध्ये सात दिवस क्वारंटाईन राहावे लागणार आहे. आगमन झाल्यावर लगेच त्यांची चाचणी होणार नसून, पाच ते सात दिवसांनी त्यांची आरटीपीसआर चाचणी होईल. यामध्ये चाचणी अहवाल निगेटिव्ह आला तर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. मात्र, पुढचे सात दिवस त्यांना घरात क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. अहवाल पॉझिटिव्ह आला आणि लक्षणे नसतील तर प्रवाशाला हॉटेलमध्ये किंवा रुग्णालयात १४ दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार आहे.
विमानतळावर आगमन झाल्यावर प्रवाशांना पीएमपीएमएच्या बसमधून हॉटेलपर्यंत पोहोचविले जाणार आहे. त्यांचे पासपोर्ट हॉटेलमध्ये जमा करावा लागणार आहे. क्वारंटाईन कालावधी संपल्यावर पासपोर्ट परत दिला जाईल. या प्रवाशांची चाचणी खासगी प्रयोगाशाळेमार्फत करण्यात येणार आहे. त्याचा खर्च प्रवाशालाच करावा लागेल.
पुणे महापालिका आणि महसूल विभागाच्या संयुक्त पथकाकडून यावर देखरेख ठेवण्यात येणार आहे. इमिग्रेशन अधिकाऱ्यांपासून ते या प्रवाशांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला पीपीई किट देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचबरोबर गेल्या पंधरा दिवसांत इंग्लंडमधून आलेल्या सर्व प्रवाशांनी पुणे महापालिकेच्या मदत कक्षाशी संपर्क साधणे बंधनकारक आहे.
पुणे महापालिकेने ठरवून दिलेल्या पंधरा हॉटेलांमध्येच राहणे आवश्यक आहे. या हॉटेलचा दररोजचा खर्च सुमारे दोन हजार ते चार हजार रुपयांपर्यंत आहे. खर्च करण्याची ऐपत नसलेल्या प्रवाशांसाठी आझम कॅम्पस येथे राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.