रहाटणीत हॉटेलच्या सुरक्षारक्षकांकडून ग्राहकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 03:41 PM2018-04-12T15:41:57+5:302018-04-12T15:41:57+5:30
रहाटणी येथील एका हॉटेलमध्ये फिर्यादी आपल्या मित्र मैत्रिणींसोबत गेले होते. त्यावेळी हॉटेल व्यवस्थापकांनी हॉटेल बंद करण्याची वेळ झाली आहे असे सांगून जेवण देण्यास नकार दिला त्यावरून दोघांमध्ये वाद झाला.
पिंपरी : हॉटेलच्या सुरक्षा रक्षकांनी ग्राहकाला किरकोळ कारणावरून मारहाण केली. हा प्रकार शनिवारी रात्री बाराच्या सुमारास रहाटणी येथे घडला. गणेश विट्ठल पिदुलकर (२८, रा. हिंजवडी) याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुरूवारी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश करम गंगावणे, अमोल विलास चौधरी आणि मंगेश वाघंबर दुवे या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, गुन्ह्याची कबुली देऊन त्यांनी अन्य दोन आरोपींची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी सनी मायकल गायकवाड, विनितकुमार विनोदकुमार सिंग या दोघांनाही ताब्यात घेतले. याबाबतची सविस्तर माहिती अशी, रहाटणीतील एका हॉटेलात गणेश आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शनिवारी रात्री गेला होता. रितसर रक्कम भरून त्याने पबचे कुपन घेतले होते. हॉटेल बंद करण्याची वेळ झाली आहे, आता जेवण देणार नाही असे हॉटेल व्यवस्थापकाने सांगितले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. हातातील लोखंडी कडे मारल्याने फिर्यादीच्या डोक्यास मार लागला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक केली आहे.