हॉटेलमध्ये ग्लासभर पाणी सहज मिळणाऱ्यांना बाटलीबंद पाण्याची सक्ती; कोरोना नियमांच्या नावाखाली होतीये लूट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 02:52 PM2022-04-03T14:52:30+5:302022-04-03T14:53:08+5:30
राजू इनामदार पुणे : ग्लासभर पाणी सहजपणे मिळणाऱ्या हॉटेलांमध्ये आता प्रत्येक ग्राहकाला बाटलीबंद पाण्याची सक्ती आहे. शहरातील साडेतीन हजारपेक्षा जास्त ...
राजू इनामदार
पुणे : ग्लासभर पाणी सहजपणे मिळणाऱ्या हॉटेलांमध्ये आता प्रत्येक ग्राहकाला बाटलीबंद पाण्याची सक्ती आहे. शहरातील साडेतीन हजारपेक्षा जास्त हॉटेलांपैकी साधारण १ हजार हॉटेलचालकांनी ग्लासमधून पाणी देणे बंदच केले आहे. यातून ३ ते ५ रुपयांची पाण्याची बाटली तब्बल १० रुपयांना विकली जात असून, त्यामधून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.
हॉटेलचालकांना परवानापत्र देताना अन्न व औषध प्रशासनाकडून अनेक अटी घातल्या जातात. त्यात पाणी द्यावे ही अट नाहीच. त्यामुळे हे खातेही या प्रकाराकडे लक्ष द्यायला तयार नाही. महापालिकेकडे आता हा विभागच राहिलेला नाही. ग्राहक असंघटित आहे. हॉटेलचालक कोरोनातील नियमावलींचा आधार घेत सुटे पाणी देऊ नये, या नियमाकडे बोट दाखवतात. ग्राहक असंघटित असल्याने त्याला हा अन्याय सहन करावा लागतो आहे.
काय होते नक्की
नाश्ता किंवा जेवण अथवा फक्त चहासाठी हॉटेलमध्ये गेल्यानंतर लगेचच पाण्याचा ग्लास पुढे केला जात असे. आता पाणी मागितले की, वेटर पाण्याची बाटलीच थेट समोर आणून ठेवतो. ती घ्यावीच लागते. त्याचे पैसे बिलात दिले जातात. बाटली का ? अशी विचारणा केल्यानंतर वेटर ग्लासमध्ये पाणी देणे कोरोनामुळे बंद आहे असे सांगतो.
बाटलीची नक्की किंमत किती
शहराच्या आसपास व काही प्रमाणात शहरातही असे बाटलीबंद पाणी तयार करण्याचे उद्योग आहेत. त्यांच्यातील काहींकडे विचारणा केल्यानंतर एका बाटलीची किंमत ३ ते ५ रुपये पडते असे सांगण्यात आले. या बाटलीत ५०० एमएल पाणी असते. हॉटेलचालक त्याचे १० रुपये सांगतात. एवढे कसे काय विचारल्यावर स्टोअर चार्जेस असेही सांगायला कमी करत नाहीत.
काय आहे कोरोनाची नियमावली
कोरोना ऐनभरात होता, त्यावेळी टाळेबंदीच होती. मग हॉटेलमालकांच्या दबावामुळे सरकारला हॉटेल खुली ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यावेळी एकूण क्षमतेच्या ५० टक्के प्रवेश व स्टिलच्या ग्लासमधून पाणी देण्यास मनाई असे काही निर्णय घेण्यात आले. तेव्हापासून हॉटेलचालकांनी बाटलीतून पाणी विकत देण्यास सुरुवात केली. आता कोरोनाचे सगळेच निर्बंध उठवण्यात आले, हा नियम मात्र हॉटेलचालक कसोशीने पाळतात.