तोतया पोलिसाकडून हॉटेल व्यावसायिकाची लुबाडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:38 AM2020-12-17T04:38:57+5:302020-12-17T04:38:57+5:30
पुणे : शहरातील एका नामांकित हॉटेल व्यावसायिकाला पोलीस व अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी असल्याची बतावणी करुन फुड पॉयझनिंगच्या ...
पुणे : शहरातील एका नामांकित हॉटेल व्यावसायिकाला पोलीस व अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी असल्याची बतावणी करुन फुड पॉयझनिंगच्या केस अडकविण्याची भिती घालून ही केस मिटविण्यासाठी तब्बल ४ लाख ७६ हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी नागेश शेट्टी (वय ५५, रा. वानवडी) यांनी लष्कर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना मोलेदिना रोड कॅम्प परिसरातील एका हॉटेलमध्ये २१ ते २४ नोव्हेंबर दरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादींच्या मोबाईलवर फोन करून आपण पोलिस व अन्न औषध प्रशासनातील अधिकारी असून, तुमच्या हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर एका मुलीला फुट पॉयझनिंग झाल्याचे सांगितले. त्यानंतर संबंधित मुलीच्या घरच्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची भिती दाखवली. पुढे ही केस जर मिटवायची असेल तर तुम्हाला पैसे द्यावे लागतील असे सांगितले. फिर्यादी घाबरल्यामुळे त्यांनी आरोपी सांगतील त्याप्रमाणे दिलेल्या क्रमांकावर वेळोवेळी तब्बल पैसे भरले. मात्र जेव्हा आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात येताच फिर्यादींनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली.