पुणे शहरातील हॉटेल्स,लॉज तूर्तास ‘वेटिंग मोड’वरच ; जिल्हाधिकारी-पोलीस आयुक्तांशी चर्चा करून निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 01:20 PM2020-07-08T13:20:01+5:302020-07-08T13:29:58+5:30
शहरातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता हॉटेल्स व्यवसायाला परवानगी देणे कितपत योग्य ठरेल याबाबत चर्चा केली जाणार
पुणे : राज्य शासनाने ८ जुलैपासून हॉटेल्स, लॉज सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी पुण्यातील हॉटेल्स, लॉज सुरू होण्यासाठी बुधवारचा मुहूर्त हुकणार आहे. येत्या दोन तीन दिवसात याबाबत जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.
राज्य शासनाने हॉटेल्स व लॉज सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर व्यावसायिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. परंतु, राज्य शासनाने परवानगी देताना स्थानिक महापालिका आयुक्तांना निर्णयाचे अधिकार दिले आहेत. महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोना झाल्याने पालिका आयुक्तांसह वरिष्ठ अधिकारी गृह विलगिकरणात आहेत. त्यामुळे याविषयावर निर्णय झालेला नाही.
शहरातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता हॉटेल्स व्यवसायाला परवानगी देणे कितपत योग्य ठरेल याबाबत जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांच्याशी चर्चा केली जाणार असून त्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे अद्याप तरी शहरातील हॉटेल्स व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. परवानगी नसताना कोणी हॉटेल्स, लॉज सुरू केले तर कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्त गायकवाड यांनी सांगितले. पालिकेच्या या निर्णयामुळे हॉटेल्स व लॉज व्यवसायिकांचा हिरमोड झाला असून पालिकेने लवकरात लवकर याबाबत निर्णय घ्यावा, तसेच लॉकडाऊनमुळे मेटाकुटीस आलेल्या व्यवसायास परवानगी द्यावी अशी मागणी हॉटेल व्यावसायिक करू लागले आहेत. पालिका नेमका काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले असून हॉटेल व्यवसायिकांना काही निर्बंध घालून परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे.