हॉटेल, मेस बंद असल्याने भाजीपाल्याला मातीमोल भाव, विकणेही परवडेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:17 AM2021-05-05T04:17:41+5:302021-05-05T04:17:41+5:30
पुणे जिल्ह्यात सातारा, सोलापूर, पुणे जिल्हा, नगर आणि नाशिक या जिल्ह्यांतून सरासरी 25 ते 28 हजार क्विंटल शेतीमाल ...
पुणे जिल्ह्यात सातारा, सोलापूर, पुणे जिल्हा, नगर आणि नाशिक या जिल्ह्यांतून सरासरी 25 ते 28 हजार क्विंटल शेतीमाल विक्रीसाठी येतो. जिल्ह्यात दर महिन्याला सरासरी 6 ते 7 कोटी रुपयांची उलाढाल होते. याशिवाय खेड, आंबेगाव, जुन्नर भागातील शेतकरी थेट मुंबईला भाजीपाला आणि फळे पाठवितात. लॉकडाऊन असले, तरी वाहतुकीला काही प्रश्न नाही. वाहतूक सुरळीत चालू आहे. मात्र, बाजारातच उठाव नाही. मोठ-मोठ्या कंपन्यांचे कॅन्टीन, हॉटेल आणि मेस बंद आहेत. त्यांच्याकडून होणारी घाऊक खरेदी बंद आहे. त्याचबरोबर पुण्यातील अनेक सोसायट्यांमध्ये निर्बंध असल्याने भाजीपाला विक्री बंद आहे. त्यामुळेही विक्रीवर फरक पडला आहे. पुण्यामध्ये सकाळी अकरा वाजेपर्यंत भाजीपाला विक्रीला परवानगी आहे. मात्र, गिऱ्हाईकच कमी झाल्याचे किरकोळ विक्रेत्या लक्ष्मीबाई ससाणे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, आम्ही खरेदी करतानाच पूर्वीपेक्षा तीस ते चाळीस टक्के भाजीपाला घेत आहे. कारण, अनेक वेळा विक्री झाली नाही तर फेकून देण्याची वेळ येते.
पुणे जिल्ह्यातून मेथी, पालक, कोथिंबीर, शेपू, चुका, चाकवत, सिमला मिरची, वांगी, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, काकडीसह विविध भाज्या शहरात विक्रीसाठी येतात. त्याचबरोर चिक्कू, पेरू, खरबूज, कलिंगड या फळांचीही आवक होते. त्यांना भावच मिळेनासा झाला आहे. पुण्याचे मार्केट यार्ड सुरू असले, तरी अनेक निर्बंध आहेत. किरकोळ विक्रेत्यांना परवानगी नाही. त्यामुळेही भाव मिळत नाही.
------
हाॅटेल, मेस, कॅन्टीन बंद असल्याने शेतीमालाला उठाव कमी आहे. यामुळेच मागणी कमी असल्याने दर देखील कमी आहेत. परंतु पुणे, पिंपरी-चिंचवडसह अन्य शहरी भागात लाॅकडाऊनचे कारण देत किरकोळ विक्रेत्यांकडून अवाच्या सवा दर आकारणी करतात. शेतकऱ्यांना दर मिळत नसले, तरी किरकोळ विक्रेत्याच्या नफेखोरपणामुळे ग्राहकांना प्रचंड महाग भाजीपाल विकत घ्यावा लागतो.