नियमांचे उल्लंघन केल्यास हॉटेल्स, बार आणि मॉल्स सील होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 04:26 AM2020-11-26T04:26:50+5:302020-11-26T04:26:50+5:30
पुणे : शहरातील कोरोनाचा पुन्हा वाढता संसर्ग पाहता, कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून घालून दिलेले नियम व अटी यांचे ...
पुणे : शहरातील कोरोनाचा पुन्हा वाढता संसर्ग पाहता, कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून घालून दिलेले नियम व अटी यांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल, बार व मॉल्सवर महापालिकेने कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे़ या कारवाईत आता केवळ दंडात्मक कारवाई न करता, थेट संबंधित आस्थापना सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत़
शहरातील अनेक हॉटेल्स, बार आणि मॉल्समध्ये फिजिकल डिस्टंसिंगसह, कोरोनाच्या अन्य नियम व अटींची अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत़ त्यामुळे पालिकेच्या १५ क्षेत्रिय कार्यालयांच्या पातळीवर १५ तपासणी पथके स्थापन करण्यात आली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या अटी व नियमांचे पालन न करणाऱ्या हॉटेल, बार व मॉल्स यांच्यावर दंडात्मक कारवाई यापूर्वी करण्यात येत होती़ पण दंडात्मक कारवाई होऊनही संबंधित ठिकाणी अटींचे पालन होत नसल्याचे आढळून आल्याने, महापालिकेने संबंधित आस्थापनाच सील करण्याचे आदेश सदर तपासणी पथकांना दिले आहेत़ दरम्यान शहरातील सर्व व्यावसायिकांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नियम व अटींचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन विक्रम कुमार यांनी केले आहे.
----------------------