हाॅटस्पाॅट १०४ गावांतील पावणे पाच लाख लोकांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:12 AM2021-04-23T04:12:29+5:302021-04-23T04:12:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात देखील कोरोना प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. हा प्रादुर्भाव वेळेवरच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात देखील कोरोना प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. हा प्रादुर्भाव वेळेवरच रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील हाॅटस्पाॅट १०४ गावांतील शंभर टक्के म्हणजे तब्बल ४ लाख ८२ हजार ६८७ लोकांची तपासणी केली. यात सुमारे १० हजार २०७ लोकांना कोरोनाची लक्षणे दिसून आली. या लोकांची कोरोना चाचणी केल्यानंतर, २५.६३ टक्के म्हणजे २ हजार ५९१ लोक कोरोना पॉझिटिव्ह आले.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात कोविड केअर सेंटरची संख्या वाढविणे, जास्तीत जास्त कोरोना पॉझिटिव्ह लोकांना त्वरित उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातून कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनच घेत आहे. याच सोबत कोरोना लसीकरणावर देखील अधिक भर दिला आहे. जिल्ह्यातील सुपरस्प्रेडर लोकांची तपासणी करणे आणि हाॅटस्पाॅट गावांतील शंभर टक्के लोकांची तपासणी असे विविध उपक्रम हाती घेतले आहेत.
गेल्या पंधरा दिवसांत जिल्हा प्रशासनाच्या वतीने अधिकारी व कर्मचारी यांची मोठी टीम लावून घरोघरी जाऊन लोकांची तपासणी केली.यात १०४ हाॅटस्पाॅट गावांत ही तपासणी केली आणि पावणे पाच लाख लोकांमध्ये केवळ २ हजार ५९१ लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. या पाॅझिटिव्ह आलेल्या लोकांना तातडीने त्या-त्या तालुक्यातील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले. यात १ हजार ९११ लोकांनी कोविड केअर सेंटरमध्ये जाण्याचा तर ६३१ लोकांनी आपल्याच घरी होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होणार आहे.
---
जिल्ह्यातील हाॅटस्पाॅट गावांची तालुकानिहाय माहिती
तालुका तपासणी केलेले लोक संशयित पॉझिटिव्ह
आंबेगाव ५११०९ २४०५ ९५८
बारामती २२२०७ ६८५ १३९
भोर १६१२५ ६२१ ६६
दौंड २९९९८ २७७ ७६
हवेली ५०५१५ १६६ ११६
इंदापूर १६९५८ २९४ ६४
जुन्नर ५७५६७ १०८७ ३३८
खेड ४८४५५ २१७ ५२
मावळ ४३९८५ १५८९ २००
मुळशी ६५०३७ १२४८ १६२
पुरंदर २२३८० ४३२ ६४
शिरूर ५७८६३ ९८२ ३१६
वेल्हा ४८८ २१२ ४०
एकूण ४८२६८७ १०२०७ २५९१