लॉकडाऊन करूनही खेड तालुका कोरोनाचे हॉटस्पॉट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:11 AM2021-05-08T04:11:51+5:302021-05-08T04:11:51+5:30
खेड तालुक्यात एक एप्रिलपासून लॉकडाऊन आहे. १५ एप्रिलपासून ते अजून कडक करण्यात आले. मात्र नागरिकांना सकाळी ७ ते ११ ...
खेड तालुक्यात एक एप्रिलपासून लॉकडाऊन आहे. १५ एप्रिलपासून ते अजून कडक करण्यात आले. मात्र नागरिकांना सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सवलत दिल्याने कोरोना विषाणूचा समूह संसर्ग सुरूच राहिला.
लॉकडाऊन करूनही जिल्ह्यात खेड तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. यात व्यापारीवर्गाची संख्या जास्त आहे. व्यापारीवर्गाची कुटुंबेच्या कुटुंबे बाधित झाली आहेत, तर त्यांच्यातील मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे. खेड तालुक्यात कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी म्हाळुंगे, चांडोली (राजगुरूनगर) येथे कोविड केअर सेंटर उभारले आहे. चांडोली ग्रामीण रुग्णालयात ४५ तर आळंदी येथे ३० बेड ऑक्सिजन बेड सुरु केले आहेत. उर्वरित ४२ खासगी दवाखान्यांमध्ये कोविड रुग्णांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. असे असतानाही तालुक्यातील रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांना या सुविधा अपुऱ्या पडत आहेत. तालुक्यातील दोन ग्रामीण रुग्णालय आणि ४२ खाजगी हॉस्पिटलमध्ये १२३९ बेडची व्यवस्था आहे. पैकी ५२१ ऑक्सिजन बेड आहेत. ४३ ठिकाणी व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. मात्र सध्याच्या परिस्थितीत खाजगी रुग्णालयात एकही बेड शिल्लक नसल्याने नवीन रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. म्हाळुंगे कोविड सेंटरमध्ये ७५२ बेड असून ५५२ बेड सध्या उपलब्ध आहेत., चांडोली कोविड केअर सेंटरमध्ये १२५ बेड असून ११ बेड आजमितीस उपलब्ध आहेत.
खेड तालुक्यात चाकण, राजगुरूनगर आणि आळंदी व त्या परिसरातील गावे कोरोनाचे हॉटस्पॉट बनली आहेत. तालुक्यातील खराबवाडी, मेदनकरवाडी, चाकण, निघोजे, म्हाळुंगे, कुरुळी, चिंबळी वाकी निघोजे, रासे, भोसे, काळूस, कडूस, दावडी आदी गावांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी शासनपातळीवर मोठे प्रयत्न सुरु आहेत. मात्र नागरिक ऐकत नसल्याने कोरोनाची साखळी तुटत नाही. उलट मजबूत होत चालली आहे. राजगुरूनगर आळंदी चाकण शहरात भाजीपाला खरेदीसाठी चार तासांत मोठी गर्दी होते. याच काळात कोरोनाचा मोठा संसर्ग होत आहेत. कुटुंबाची कुटुंबे बाधित होत असताना नागरिक मात्र काळजी घेत नाहीत. संसर्ग झालेली व्यक्तीसह त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती खुलेआम फिरत असल्याने कोरोनाचे संकट तालुक्यात अधिकच दाट होत चालले आहे.