रंगरेषांच्या जादूगारासोबत रंगला बालचमूंचा तास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 06:54 PM2019-01-01T18:54:56+5:302019-01-01T18:57:09+5:30
कॅनव्हासवर चित्र रेखाटणा-या रंगरेषेच्या जादूगारासोबत बिनभिंतीच्या शाळेमध्ये बालचमूंचा तास भरला.
पुणे : कृतज्ञता हा सुंदर दागिना प्रत्येक माणसाकडे असायला हवा, असे सांगत कॅनव्हासवर चित्र रेखाटणा-या रंगरेषेच्या जादूगारासोबत बिनभिंतीच्या शाळेमध्ये बालचमूंचा तास भरला. ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार शि.द.फडणीस आजोबा या तासाला शिकवायला होते. पुण्यातील सण-उत्सवांपासून ते यश-अपयश पचविण्याच्या शक्तीविषयी सांगणारे हे वयाची नव्वदी पार केलेले रंगरेषेचे जादूगार समोर पाहून प्रत्येक चिमुकला कुतुहलाने त्यांचे विचार ऐकत होता.
अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे सरत्या वर्षाला निरोप देण्याकरिता आणि वेंकीज उद्योग समूहाचे संचालक व्यंकटेश राव यांच्या वाढदिवसानिमित्त मंडईतील एकलव्य फाऊंडेशनमध्ये अनाथ मुलांकरीता आयोजित स्नेहभोजनाचे. यावेळी शकुंतला फडणीस, सरस्वती मंदिर संस्थेचे अध्यक्ष व्ही.व्ही.आंबेकर, स्वराज्यरक्षक संभाजी फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, एकलव्य फाऊंडेशनच्या रेणू गावस्कर, मनिषा धारणे, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सुर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव, मोहन ढमढेरे, अभिनेत्री गिरीजा पाटील आदी उपस्थित होते. उपक्रमाचे यंदा १५ वे वर्ष आहे. बालकलाकार शांभवी भरेकर, साक्षी मेठे यांचा विशेष सन्मान कार्यक्रमात करण्यात आला.
संस्थेत आलेले पाहुणे चक्क आपल्याला जेवण वाढतायंत हे पाहून थक्क झालेल्या मुलांनी रुचकर जेवणाचा आनंद देखील घेतला. लाखो रुपयांची उधळपट्टी करीत ठिकठिकाणी रंगणा-या नववर्षाच्या पार्टीपेक्षा अनाथ मुलांसाठी स्नेहभोजनाचा एक अनोखा उपक्रम राबवित सरत्या वर्षाला निरोप देत मंडई परिसरातील तरुणांनी या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
शि.द.फडणीस म्हणाले, उत्सव अनेक होतात, धार्मिक संस्थांचा त्यामध्ये मोठा सहभाग असतो. त्यामुळे आता समाजातील उणीवा भरुन काढण्याचे काम करणारी मंदिरे वाढणे गरजेचे आहे. ज्ञान देणारी व समाजासाठी काहीतरी करणारी मंदिरे व्हायला हवी. प्रत्येकाने आयुष्यात अनेक गोष्टी शिकायला हव्या. यश-अपयश पचविण्याची ताकद असेल, तर आपण यशस्वी होऊ शकतो.
रेणू गावस्कर म्हणाल्या, समाजातील कर्तृत्वाने मोठे असलेल्या व्यक्तींचा परिसस्पर्श लाभणे, हा विलक्षण योग आहे. जे पुस्तक किंवा शालेय शिक्षण शिकवू शकत नाही, ते या साध्या माणसांकडून शिकायला मिळते. त्यामुळे अंगावरील सोन्यापेक्षा समाजासाठी काम करणारी ही दागिन्यांसारखी व्यक्तिमत्वे अत्यंत महत्वाची आहेत. चिमुकल्यांनी जादूचे प्रयोग व टॅटू मेकिंग चा आनंद लुटला. श्रद्धा भोईटे यांनी सूत्रसंचालन केले.