घर, बार, अपघात स्थळ; सर्वच सीसीटीव्ही फुटेज हाती, अग्रवाल कुटुंबियांची कुंडलीच पोलिसांकडे
By नितीश गोवंडे | Published: May 26, 2024 04:27 PM2024-05-26T16:27:53+5:302024-05-26T16:28:04+5:30
चालकाला डांबून ठेवणं, दबाव टाकणे, जीवे मारण्याची धमकी, सीसीटीव्हीशी छेडछाड, छोटा राजनशी असलेले कनेक्शन तीन पिढ्यांना जेलची हवा खावी लागणार
पुणे : बिल्डर विशाल अग्रवाल याच्या घरावर छापेमारी केल्यानंतर आता पुणेपोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तब्बल १०० पेक्षा अधिक सीसीटिव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजची तपासण्यात येत आहे. कल्याणी नगर अपघातात दररोज मोठमोठे खुलासे होत असताना, सीसीटीव्ही फुटेजमुळे अग्रवाल कुटुंबियांची कुंडलीच पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आल्यानंतर तपासाला चांगलाच वेग आला आहे.
विशाल अग्रवाल याचे घर, कोझी पब, ब्लॅक हॉटेल आणि अपघात स्थळ अशा सगळ्या ठिकाणचे फुटेज पोलिसांनी गोळा केले आहे. त्यासोबतच त्या रात्री गाडी ज्या परिसरात फिरली. त्या प्रत्येक परिसराचे सीसीटीव्ही पोलिसांनी मागवले आहे. या सगळ्याची पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून पडताळणी करण्यात येणार आहे. हा सगळा तपास अत्यंत कडक स्वरूपाचा करण्यात येणार आहे. यातून सगळ्या प्रकरणाची क्रोनोलॉजीची माहिती मिळणार आहे आणि गुन्हे शाळेच्या हाती अनेक धागेदोरे लागण्याची शक्यता आहे.
बाळाच्या चुकीमुळे तीन पिढ्यांना जेलवारी..
अल्पवयीन बाळाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल याला २८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. चालकाला डांबून ठेवणं, दबाव टाकणे, जीवे मारण्याची धमकी या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. तसेच सीसीटीव्हीशी छेडछाड केल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांनी प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असून त्यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत. सुरेंद्रकुमार अग्रवाल याचे छोटा राजनशी असलेले कनेक्शन या निमित्ताने पुन्हा समोर आल्याने प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली आहे. त्यातच दोघा बाप-बेट्यांनी त्यांच्या चालकाला डांबून ठेवून धमकी दिल्याने अग्रवाल यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. बाळाच्या चुकीमुळे तीन पिढ्यांना जेलची हवा खावी लागत असल्याचे बोलले जात आहे.