Pune Crime: नऱ्हे, कोथरूड, कोंढव्यात घरफोड्या पावणेसात लाखांचा ऐवज लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 08:43 AM2023-09-05T08:43:22+5:302023-09-05T08:44:04+5:30
या प्रकरणी सिंहगड, कोथरुड आणि कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे...
पुणे : शहरात सोनसाखळी आणि पाकीटमारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, घरफोड्यांच्या घटनाही दररोज घडत आहेत. शहरातील तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये पावणेसात लाखांचा मुद्देमाल चोरीला गेल्याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा नाेंदविला आहे. नऱ्हे, कोथरुड आणि कोंढवा परिसरातील घरातून चोरट्यांनी ६ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी सिंहगड, कोथरुड आणि कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
नऱ्हे येथील मयूर पवार (३६) यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, घड्याळ, चारचाकी गाडीची चावी असा २ लाख ९६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सिंहगड रोड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २ ते ३ सप्टेंबरच्या दरम्यान घडली. दुसऱ्या घटनेत जिजाई नगरी, कोथरुड येथील एका बंद फ्लॅटमधून चोरट्यांनी २ लाख ४५ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. ही घटना रविवारी पहाटे घडली. या प्रकरणी सुरज दामरे (३५) यांनी कोथरुड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तिसऱ्या घटनेत कांतिनी अपार्टमेंट, श्रद्धानगर, कोंढवा येथील फ्लॅटमधून चोरट्यांनी ६० हजार रोख आणि सोन्याचे दागिने असा १ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी राकेश सुरवाडे (४७, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कोंढवा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.