गणेश बिडकर महापालिकेचे सभागृह नेते : उपमहापौरपद ‘आरपीआय’ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:28 AM2020-12-11T04:28:08+5:302020-12-11T04:28:08+5:30
पुणे : पुणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या बदल्यांमध्ये सभागृहनेतेपदी स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर यांची नियुक्ती निश्चित मानली जात आहे. उपमहापौरपदी रिपब्लिकन ...
पुणे : पुणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या बदल्यांमध्ये सभागृहनेतेपदी स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर यांची नियुक्ती निश्चित मानली जात आहे. उपमहापौरपदी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सुनिता परशुराम वाडेकर यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
महापालिकेत एकहाती सत्ता असलेल्या भाजपकडून, महापौर, उपमहापौर, सभागृहनेते, स्थायी समिती अध्यक्ष या पदांवर दरवर्षी नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय राज्यातील पक्ष नेतृत्त्वाने घेतला होता. त्यानुसार हे बदल केले जात असल्याचे सांगितले जात आहे. याच निकषाने महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याबाबतीत काय निर्णय होणार, हे शुक्रवारी (दि. ११) होणाऱ्या भाजपा नगरसेवकांच्या बैठकीत ठरेल, असे सूत्रांनी सांगितले. ‘आरपीआय’ने भाजपला पाठिंबा दिला असल्याने त्यांना एक वर्षाकरीता उपमहापौरपद दिले जात आहे़
विद्यमान महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांचा एक वर्षाचा कालावधी पुर्ण झाल्याने, त्या जागी वर्णी लावण्यासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. मात्र यात अनुभवाच्या जोरावर बिडकर यांनी बाजी मारल्याचे स्पष्ट होत आहे.
बिडकर हे स्विकृत सदस्य असल्याने शंका उपस्थित केली गेली. आर्थिक खर्चाच्या बाबतीतले तसेच सह्यांचे अधिकार असलेल्या महापौर, स्थायी समिती अध्यक्ष या पदांवर स्विकृत सदस्याची निवड केली जात नाही. मात्र गटनेतेपद हा पक्षांतर्गत विषय असल्याने त्या ठिकाणी कायदेशीर प्रश्न येत नाही, असे सांगण्यात आले.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता भाजपा नगरसेवकांची बैठक होणार असून या बैठकीत निर्णय होणार आहे़ महापौरपदी मोहोळ यांना प्रदेश भाजपाने मुदतवाढ दिली असल्याने त्यांचे पद सुरक्षित असल्याचे सांगितले जाते. मात्र त्यांना किती मुदतवाढ मिळणार हे उद्याच्या बैठकीत स्पष्ट होईल. स्थायी समिती अध्यक्षपदाची हेमंत रासने यांची मुदत मार्चमध्ये संपणार आहे. त्यामुळे दुसरा अर्थसंकल्प मांडण्याची संधी त्यांना मिळणार की त्यांच्या जागी नवीन चेहरा येणार हे फेब्रुवारी महिन्यात स्पष्ट होईल.