दूध व्यवसायाला घरघर
By Admin | Published: January 8, 2017 03:16 AM2017-01-08T03:16:02+5:302017-01-08T03:16:02+5:30
शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करतो. पूर्वी सगळीकडे सहकारी दूध संस्था होत्या. परंतु, अलीकडील काळात खासगी दूध संस्थांचे जाळे पसरले आहे. मात्र, खर्चाचा
लासुर्णे : शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करतो. पूर्वी सगळीकडे सहकारी दूध संस्था होत्या. परंतु, अलीकडील काळात खासगी दूध संस्थांचे जाळे पसरले आहे. मात्र, खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने दूध व्यवसाय अडचणीत आला आहे.
सध्या खासगी दूध संस्था प्रतिलिटर २२ रुपये दर देतात. तर पुणे जिल्हा कात्रज संघ हा प्रतिलिटर साडेपंचवीस रुपये आणि दिवाळीला सभासदांना प्रतिलिटर एक रुपया बोनस स्वरूपात देतो. त्यामुळे त्यांचा दर साडेसव्वीस रुपये प्रतिलिटर मिळतो. या दोन संस्थेत प्रतिलिटर साडेतीन रुपये फरक आहे. तसेच या खासगी दूध संस्थांचे पशुखाद्य निर्मितीचे कारखाने असल्याने पशुखाद्याचे दरही गगनाला भिडले आहेत. जे शेतकरी खासगी दूधसंस्थेला दूध देतात त्यांचा खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने दूध व्यवसाय अडचणीत आला आहे. यासाठी या खासगी दूध संस्थेवर तसेच पशुखाद्याच्या कारखान्यांवर शासनाने निर्बंध लादण्याची मागणी होत आहे.
इंदापूर तालुक्यात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दूध व्यवसाय करतात. परंतु, अलीकडे खासगी दूध संस्थांच्या मनमानी कारभारामुळे पुणे जिल्हा कात्रज संघापेक्षा खासगी दूध संस्थांचे दूधदर फारच कमी असल्याने या भागातील दूध व्यवसाय अडचणीत आला आहे. या भागात खासगी दूध संस्थेच्या पशुखाद्याची ५० किलोची गोणी १ हजार ६० रुपये तर ६० किलोची ११७० रुपये मिळते. एक गाय जर १८ लिटर दूध देत असेल तर त्या गाईला एका दिवसात होणार खर्च असा, की एका दिवसात एका गाईला सुका चारा ५ ते ७ किलो २० ते २५ रुपये,ओला चारा २५ ते ३० किलो ७५ ते ८० रुपये, पशुखाद्य २ किलो गाईच्या तब्बेतीसाठी तर प्रतिलिटर ८ ते ९ किलो १७६ रुपये आाणि मेडिकल खर्चासाठी १० रुपये असा मिळून २८६ ते २९० रुपये प्रतिदिवस खर्च होत आहे. दुधाचे ३९६ रुपये होतात. त्या शेतकऱ्याची मजुरी वजा जाता फक्त शेणखत शिल्लक राहात असल्याने या भागातील दूध व्यवसाय अडचणीत आला आहे. यासाठी शासनाने खासगी दूध संस्थेवर तसेच त्यांच्या असणाऱ्या पशुखाद्याच्या कारखान्यावर निर्बंध लादून दूधदर सहकारी संस्थेएवढा तर पशुखाद्याचे दर कमी करण्याची मागणी होत आहे.