सदनिकेचा भाडे करार आता थेट पोलिसांकडे : वेळेची होणार बचत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 02:46 PM2019-08-24T14:46:17+5:302019-08-24T14:47:17+5:30
आता कराराची नोंदणी झाली की संगणकाच्या माध्यमातून ही सर्व माहिती पोलिसांकडे त्वरीत जमा होईल..
पुणे : घरमालक व भाडेकरू यांच्यात होणाऱ्या कराराची नोंदणी केली की आता त्याची माहिती थेट पोलिसांकडे पोहचणार आहे. यामुळे पोलिसांकडे जाण्याची फेरी वाचणार असून त्यातून वेळेची बचतही होणार आहे. सरकारी कामकाज लोकाभिमूख व्हावे असे सरकारचे धोरण असून त्याला पुरक असाच हा निर्णय असल्याचे मत या प्रणालीचे उद्घाटन करताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
मुद्रांक शुल्क कार्यालय तसेच पोलिस आयुक्त कार्यालय यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या या संगणक प्रणालीची सुरूवात पाटील यांनी हस्ते शुक्रवारी दुपारी नव्या प्रशासकीय इमारतीमधील मुद्रांक शुल्क कार्यालयात झाली. राज्याचे जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, अतिरिक्त जमाबंदी आयुक्त ओमप्रकाश देशमुख, पोलिस आयुक्त के.व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक अनिल कवडे, नोंदणी उपमहानिरिक्षक सोनप्पा यमगर, सहनोंदणी महानिरीक्षक नयना बोंदार्डे तसेच या विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
चोक्कलिंगम यांनी प्रास्तविक केले. या आधी घरमालक भाडेकरू यांनी कराराची नोंदणी केल्यानंतर त्यांना ती कागदपत्रे घेऊन पोलिसांकडे जाऊन तिथे जमा करावी लागत असे. यात त्यांचा वेळ तर खर्च होत असेच शिवाय पोलिसांकडेही ती कागदपत्रे गहाळ वगैरे होत असत. आता कराराची नोंदणी झाली की संगणकाच्या माध्यमातून ही सर्व माहिती पोलिसांकडे त्वरीत जमा होईल, त्यासाठी तिथे स्वतंत्रपणे जाण्याची गरज पडणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
कवडे यांनी मुद्रांक शुल्क विभागाच्या कामाची तसेच डिजीटल कामाकाजासाठी सुरू केलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली. पोलिस आयुक्त वेंकटेशम यांनी पोलिस व सर्व सरकारी कार्यालये यांच्यात समन्वय साधून नागरिकांची कामे कमीतकमी वेळात जास्तीतजास्त चांगल्या दर्जाची कशी होईल यासाठी पोलिस आयुक्तालय प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. पाटील यांच्या हस्ते यावेळी मुद्रांक शुल्क विभागाची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.