केवळ मालिका चालवण्यासाठी नराधमांना पाठीशी घालणे कितपत योग्य? अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांचा संतप्त सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 11:57 AM2020-11-04T11:57:25+5:302020-11-04T19:11:24+5:30
तुम्ही सोशल मीडियावर माझी लाज काढता. तुम्ही ३५ वर्षांपासून या चित्रसृष्टीत आहात. तुमची अशी भूमिका धक्कादायक आहे..
पुणे : मी स्वतः मालिका सोडली. त्यांनी मला काढले नाही. अलका ताईंनी केलेले आरोप अतार्किक आहेत. विवेक सांगळे याने माझ्याशी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तरीही, केवळ मालिका चालवण्यासाठी नराधमांना पाठीशी घालणे योग्य आहे का? त्यासाठी तुम्ही सोशल मीडियावर माझी लाज काढता. तुम्ही ३५ वर्षांपासून या चित्रसृष्टीत आहात. तुमची अशी भूमिका धक्कादायक आहे. ज्या माऊलीने मला तळहातावरील फोडाप्रमाणे जपले. त्या आईबद्दल कोणी अपशब्द काढले तर ते मी कसे ऐकून घेईन? त्याचे तुम्हाला काहीच वाटू नये? असा संतप्त सवाल उपस्थित करत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी त्यांच्यावर होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
पुण्यात अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्याशी वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या.
गायकवाड म्हणाल्या, प्रोजेक्ट साइन केला तेव्हा छोटे कपडे घालावे लागतील, असे सांगण्यात आले नव्हते. एका आर्टिस्टना जखम झाली होती, त्यांचे रक्त साडीला लागले होते. ती साडी मला नेसायला देण्यात आली. कोव्हीडच्या काळात असे करणे योग्य नाही. याबाबत माझ्या आईने केवळ प्रश्न उपस्थित केला. त्यावरून माझी आई सेटवर लुडबुड करते, असा आरोप होत असेल तर ते चुकीचे आहे.
एका व्हिडीओमध्ये त्या म्हणतात की आमच्या सेटवर शिवीगाळ होत नाही. दुसऱ्या व्हिडीओमध्ये म्हणतात की शिवीगाळ झाली. नेमके काय खरे? हा प्रश्न उपस्थित होतो. परंतू, आजही माझ्या मनात अलका कुबल यांच्याबद्दल आदराचे स्थान आहे. मात्र, निर्माती म्हणून चुकीच्या गोष्टीविरोधात त्यांनी भूमिका घेणे आवश्यक होते. त्यांच्या या वागण्याची खंत वाटते.
.....
चार महिने शूटिंग केले एक रुपयाही नाही मिळाला...
चार महिने शूटिंग सुरू होते. मात्र, आजपर्यंत एकाही दिवसाचे मानधन मिळालेले नाही.एक रुपयाही मिळाला नाही. तसेच मी सामान्य घरातील आहे. वडील काम करतात तेव्हा घरात चूल पेटते. तरीही मी कोविडची परिस्थिती समजून घेऊन जुलैपासून शूटिंग करत असून आजपर्यंत मानधन मिळाले नाही. तरी मी गप्प राहिले. केवळ मला बदनाम करण्यासाठी आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. - प्राजक्ता गायकवाड