पुणे शहरात लॉकडाऊन - ४ चे नियम कसे असणार, कोणत्या परिसरात काय सुरु राहणार? जाणून घेऊयात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 11:57 PM2020-05-19T23:57:14+5:302020-05-20T00:17:16+5:30
संपूर्ण शहरात संध्याकाळी सात ते सकाळी सातपर्यंत कर्फ्यु
पुणे : लॉकडाऊन ४ मधील पुणे महापालिका कार्यक्षेत्राकरिता नवीन सुधारित आदेश जारी करण्यात आले असून, संपूर्ण शहरात संध्याकाळी सात ते सकाळी सातपर्यंत कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. तसेच सर्व प्रकारच्या क्षेत्रामध्ये ६५ वयोगटापेक्षा जास्त व १० वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना अत्यावश्यक सेवा व आरोग्य विषयक कारणाव्यतिरिक्त घराबाहेर पडता येणार नाही. तर कंटेन्मेंट झोनमध्ये (प्रतिबंधित क्षेत्रात) केवळ औषध विक्रीची दुकाने, बाह्य रूग्ण सेवा व दवाखानेच सुरू राहणार असून, किराणा माल, भाजीपाला विक्रीस आता बंदी घालण्यात आली आहे. तर खाजगी कार्यालये वगळता अन्य शासकीय कार्यालये निर्धारित कर्मचारी वर्गाच्या टक्केवारीनुसार राज्य शासनाच्या नियमानुसार खुली राहणार आहेत.
पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबतचे आदेश जारी केले असून, मंगळवारी रात्री १२ वाजल्यापासून ते पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार आहेत. नव्याने जारी केलेले ६५ कंटेन्मेंट झोन हे पूर्णपणे सील केले जाणार असून, यामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा व पुरवठा सुरूळीत ठेवण्यासाठी या सेवा देणाऱ्या व्यक्तीं व्यतिरिक्त अन्य नागरिकांना प्रवेश करण्यास व बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर या भागात रूग्णवाहिका व केवळ महापालिकेच्या सेवा देणाऱ्या वाहनांनाच (पाण्याचे टँकर, अग्निशामक दलाची वाहने, कचरा वाहतुक गाडी ) व अत्यावशक सेवा देणारे कर्मचारी व अधिकारी यांना प्रवेश देण्यात येणार आहे.
कंटन्मेंट क्षेत्रा व्यतिरिक्त इतर भागात नव्याने काही सवलती देण्यात आल्या असल्या तरी, एखाद्या इमारतीत अथवा गृह निर्माण सोसायटी येथे कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या आढळून आल्यास तो भाग सील करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. तर कंटन्मेंट झोन बाहेरील भागातील मॉल, रिक्षा / कॅब, वाहतुक करणाºया बसेस, केश कर्तनालय, ब्युटी पार्लर,स्पा हेही पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत.
परवानगी देण्यात आलेले :
* उद्योग व व्यवसाय : सर्व प्रकारचे दवाखाने, इस्पितळे, औषध विक्रीची दुकाने, अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे व्यवसाय यात औषधी, वैद्यकीय उपकरणे व त्यांना लागणारा कच्चा माल इ. तसेच ज्या ठिकाणी वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी कामामध्ये सातत्य ठेवावे लागते अशा बाबी : माहिती व तंत्रज्ञान विषयक हार्डवेअरची निर्मिती तसेच पॅकेजिंग करिता लागणाऱ्या वस्तूंची निर्मिती, अन्न प्रक्रिया उद्योग जसे ब्रेड उत्पादक कारखाना, दुध प्रक्रिया केंद्र, पिठाची गिरणी, दालमिल.
* घरकाम करणाऱ्या व्यक्ती : कंटन्मेंट क्षेत्राबाहेर राहणाºया कोणत्याही व्यक्तीच्या घरी त्या घरमालकाची इच्छा असल्यास स्वेच्छेने काम करता येईल. परंतू कंटन्मेंट भागातील व्यक्तीस हे काम करता येणार नाही.
* ज्येष्ठ नागरिक : ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मदतीसाठी लागणाऱ्या व्यक्ती, रूग्णसेवेसाठी मदतनीस व्यक्ती, हेल्पर, घरकाम करणारी व्यक्ती, वाहनचालक इ.
*शासकीय कार्यालये : सर्व केंद्रीय कार्यालयांमध्ये उपसचिव आणि समकक्ष व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे सर्व अधिकारी कार्यालयात उपस्थित राहू शकतात. तर त्यांच्या अन्य कर्मचाऱ्यांच्या एकूण संख्येच्या ३३ टक्के कर्मचारी वापरून सदर कार्यालय सुरू ठेवता येईल. राज्य शासनाची सर्व कार्यालये शासनाने विहित केलेल्या कर्मचारी मर्यादेत सुरू ठेवता येणार आहेत.
* वर्तमानपत्रे : वर्तमानपत्रे वितरण सकाळी ७ ते सकाळी १० पर्यंत वितरित करता येतील. यावेळी वितरण करणाऱ्या व्यक्तीने मास्कचा वापर आणि वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक राहिल. तसेच इलेक्ट्रॉनिक मिडिया,केबल सर्व्हिस सुरू राहतील.
* वित्तीय क्षेत्र : सर्व बँका, एटीएम, सहकारी पतसंस्था, विमा कंपन्या व आरबीआयने नियंत्रित केलेल्या आर्थिक संस्था कमीत कमी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहतील.
* ई-कॉमर्स : ई-कॉमर्सच्या माध्यमातून घरपोच अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करता येईल. तसेच कुरिअर सेवाही सुरू राहतील.
* वाहन वापर : केवळ अनुज्ञेय कामांसाठी वैयक्तिक वाहन वापरता येईल. तथापि चार चाकी वाहनामध्ये चालका व्यतिरिक्त दोन व्यक्तींना परवानगी असेल. तर दुचाकी वाहनात मागच्या सीटवर व्यक्तीला नेता येणार नाही.
* माहिती तंत्रज्ञान : माहिती तंत्रज्ञान विषयक काम करणारे व सेवा देणारे व्यवसाय त्यांच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ५० टक्के कर्मचाऱ्यांवर सुरू ठेवता येतील. तसेच डाटा व कॉल सेंटरमधील कमीत कमी कर्मचाऱ्यांच्या वापर करून सुरू ठेवता येईल.
* खाद्य पदार्थ सेवा : खाद्य पदार्थ सेवा देणारे म्हणजे हॉटेल व्यावसायिकांना केवळ पार्सल सेवा सुरू ठेवता येईल.
* बांधकाम विषयक : बाहेरील मजूर न आणता कामाच्या जागेवर मजुरांची राहण्याची व्यवस्था होत असेल तर अशी बांधकामे आणि अपांरपारिक उर्जा प्रकल्पांची कामे करता येतील. पुणे मनपाने ज्या पूर्व पावसाळी कामांना, मेट्रोच्या कामांना, धोकादायक इमारतीबाबत करावयाची कारवाई तसेच पूरपरिस्थिती होऊ नये म्हणून ज्या कामांना पूर्व परवानगी देण्यात आली आहे अशी कामे सुरू राहतील.
* पथारी व्यावसायिक : अधिकृत पथारी व्यावसायिकांना सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत २ पथारी व्यावसायिकांमध्ये १० मिटरचे अंतर ठेऊन व्यवसाय करता येईल.
* सुरक्षा व सेवा व्यवस्था : रहिवासी संकुल व कार्यालयांना लागणाºया सेवा व सुरक्षा पुरविणाºया खाजगी संस्था सुरू राहतील.
* दुकाने : कंटन्मेंट झोनच्या व्यतिरिक्त मनपा क्षेत्रामध्ये सर्व प्रकारचे मॉल बंद राहतील. मात्र, व्यापारी संकुलामधील केवळ अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहतील. तसेच रस्त्यांवरील स्वतंत्र दुकाने, रहिवाशी कॉलनीतील दुकाने व रहिवाशी संकुलातील दुकाने उघडी राहतील.