हॉकर्स झोन निर्माण करणार
By admin | Published: June 14, 2014 01:47 AM2014-06-14T01:47:52+5:302014-06-14T01:47:52+5:30
प्राधिकरणातील पेठ १ ते ४ व ६ मधील मोकळ्या भूखंडांना सीमाभिंत बांधण्याचे ठरले. तसेच विविध क्रीडा सुविधांसाठी पेठ ४, ९ आणि २८ मध्ये क्रीडांगणे तयार करण्यात येणार आहे
पिंपरी : प्राधिकरणाने संपादित केलेल्या मोकळ्या भूखंडांना सीमाभिंत बांधणे, विविध क्रीडा सुविधा देण्यासाठी क्रीडांगणे उभारणे, हॉकर्स झोन व पार्किंग झोन, मॉल, प्राधिकरण बाजार उभारणे, तसेच उड्डाणपुलाच्या वाढीव खर्चास मान्यता देणे अशा विविध विषयांना पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या सभेत मान्यता देण्यात आली. २१ कोटी ४७ लाखांच्या प्रकल्पाच्या खर्चास मंजुरी देण्यात आली.
प्राधिकरणाची सभा विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात झाली. या वेळी जिल्हाधिकारी सौरभ राव, मुख्याधिकारी डॉ. योगेश म्हसे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक बी. डी. यमगर, सह शहर अभियंता एम. टी. कांबळे आदी उपस्थित होते. प्राधिकरणातील पेठ १ ते ४ व ६ मधील मोकळ्या भूखंडांना सीमाभिंत बांधण्याचे ठरले. तसेच विविध क्रीडा सुविधांसाठी पेठ ४, ९ आणि २८ मध्ये क्रीडांगणे तयार करण्यात येणार आहे. सेक्टर ४ मध्ये हॉकर्स झोन उभारण्याचा निर्णय झाला. तसेच औंध-रावेत येथील उड्डाणपुलाची लांबी वाढल्याने अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात आली. प्राधिकरण क्षेत्रातील प्रमुख रस्त्यांवर महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृह उभारण्यासाठी अशासकीय संस्थांकडून निविदा मागविण्याचेही ठरले. प्राधिकरण क्षेत्रातील सेक्टर १ व ३९ मध्ये प्राधिकरण बझार बांधण्यात येणार आहे. तसेच सेक्टर ३९ मध्ये क्रीडांगण, वाकडमधील सेक्टर ४० मध्ये पोलीस स्टेशन बांधण्याचाही निर्णय झाला. सेक्टर २९ व ४२ मधील मोकळ्या जागेस सीमाभिंत बांधण्याच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. यासह विविध कामांना मंजुरी दिली. (प्रतिनिधी)