दुधाचे दर कमी केल्यामुळे शेतकरीवर्गाने जगायचे तरी कसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:07 AM2021-06-19T04:07:55+5:302021-06-19T04:07:55+5:30
कोणतेही सबळ कारण नसताना खासगी दूध संघांनी गायीच्या दूधदरात २ रुपयांनी कपात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दुधाचा दर २४ ...
कोणतेही सबळ कारण नसताना खासगी दूध संघांनी गायीच्या दूधदरात २ रुपयांनी कपात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दुधाचा दर २४ रुपयांवरून २२ रुपये प्रतिलिटर आला आहे. शेतकऱ्यांसाठी दूधदरात ही कपात झाली असली तरी दूध ग्राहकांना मात्र गाईचे दूध जुन्या वाढीव दर ४७ ते ४८ रुपये/प्रति लिटर दराने विकत घ्यावे लागते. प्रचंड नफेखोरी करून मधले दलाल मालामाल तर शेतकरी कंगाल होत आहेत.
दूध मागणी वाढ तरीही दूधदर कपात.
कोरोना लॉकडाउन नंतर दुधाची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. आरोग्याच्या दृष्टीने रोगप्रतिकारक स्वास्थ्यवर्धक म्हणून जनतेचे दुधाचा आहारात व पिण्यासाठी वापर वाढला आहे. सध्या हॉटेल व्यवसायही सुरू झाला आहे. सणासुदीच्या काळात दूध व दुधाच्या पदार्थांची मागणी वाढली आहे. दुधाच्या पावडरचे दरही किलोमागे वाढले आहेत. तरीही खासगी दूध संघाच्या मालकांनी एकत्र येऊन दुधाच्या दरात २ रुपये कपात केली आहे. शेतकऱ्यांच्या दूध प्रश्नांवर सत्ताधारी तसेच विरोधी पक्ष गंभीर नाही. सरकार लक्ष देत नाही आणि विरोधी पक्ष फक्त फोटोपुरते आंदोलन करतो त्यामुळे आपली घुसमट कोणाकडे मांडावी हाच प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
राज्यातील सहकारी व खासगी दूध संघ राजकीय नेत्यांच्या वर्चस्वाखाली आहेत. दूधउत्पादक शेतकरी व दूध ग्राहकांची लूट हा एकमेव अजेंडा ह्या लोकांचा आहे.
दलालांची नफेखोरी
शेतकऱ्यांकडून २२ रुपये दराने गाईचे दूध खरेदी करून ग्राहकांना ४८ रुपये म्हणजे तब्बल लिटर मागे २६ रुपयांची नफारूपी मलईमधले दलाल खात आहेत.
पशुखाद्यदरात जवळपास २० ते २५ टक्केपेक्षा जास्त वाढ झाली आहे. सातत्याने होत असलेली
दूधदर कपात व पशुखाद्यदरात होत असलेल्या वाढीमुळे दूध उत्पादक शेतकरी बांधवावर आत्महत्या करण्याची वेळ लुटारू व्यवस्थेने आणली आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून, शेतकरीवर्ग दूध उत्पादक बनला होता. मात्र, बाटली बंद पाण्याच्या किमतीपेक्षा कमी किमतीत गाईच्या दुधास बाजारभाव मिळत असल्याने, शेतकरीवर्ग मेटाकुटीस आला असून, गाईच्या दुधाला किमान ३२ रुपये प्रतिलिटर दर मिळाला तरच हे शेतकरी दूध व्यवसायात तग धरू शकतो".
उमेश भाऊसाहेब भुजबळ.
दूध उत्पादक शेतकरी वाल्हे.
"कोरोना संकटामुळे दुधाची मागणी प्रचंड प्रमाणात घटली असल्याचे कारण देत, दूध संघाने दुधाच्या दरामध्ये कपात केली असल्याने, परिणामी दूध उत्पादक शेतकरीवर्गाला दूध संघाकडून मिळत असलेल्या बाजारभावाप्रमाणे प्रतिलिटर दूधदर देण्यात येतो. मात्र शासनाने, शेतकऱ्यांच्या खरेदीच्या दुधाला योग्य दर वाढवून द्यावा, नाहीतर दूध डेअरी यापुढे चालवणे अवघड होत आहे. परिणामी दूधसंघासह भविष्यात दूधटंचाईची अडचण निर्माण होऊ शकते. यामुळे शासनाने लक्ष केंद्रित करून दूध उत्पादक शेतकरीवर्गाला प्रतिलिटर १० रूपये दरवाढ करावी".
अमोल खवले
दूध डेअरी चालक, वाल्हे.