कर्मचारी एवढे बिनधास्त कसे काय? पुणे महापालिकेत साडे पाच वर्षांत २२ लाचखोरांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 11:11 AM2023-07-13T11:11:27+5:302023-07-13T11:11:51+5:30
पुणे महापालिकेत गेल्या पंधरा दिवसांमध्ये दोन कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले
पुणे : पुणे महापालिका पारदर्शक कारभारासाठी ऑनलाइन दाखले, प्रमाणपत्र देण्यासाठी ॲप, चॅटबॉट यासह इतर सुविधा निर्माण करत आहे. मात्र, त्याचवेळी महापालिकेत नागरिकांची कामे अडवून ठेवून त्यांच्याकडे पैसे मागण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. पालिकेत गेल्या पंधरा दिवसांमध्ये दोन कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. महापालिकेत २०१८ ते जुलै २०२३ या साडेपाच वर्षांच्या कालावधीत लाच घेताना २२ जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. या सर्वांवर कारवाई करून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागात निवृत्त मुकादमाची पेन्शन मंजूर करण्यासाठी बिगाऱ्याने तब्बल १ लाख रुपयांची लाच मागितली. ते पैसे घेताना त्याला रंगेहाथ पडकले होते. त्यानंतर बांधकाम व्यावसायिकाला पाणीपुरवठा करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या उमेश कवठेकर या कर्मचाऱ्याला पकडण्यात आले.
महापालिकेच्या नगररस्ता-वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयात साफसफाईचे काम करणारे संतोष वाल्हेकर यांनी एका महिलेस तिघांकडून महापालिकेत नोकरी लावून देण्याच्या अमिषाने १७ लाख ५० हजार रुपये घेतले होते. या प्रकरणात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने वाल्हेकर यांच्यावर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आली होती. त्यानंतर वाल्हेकरला पालिका सेवेतून निलंबन करण्यात आले. महापालिकेत २०१८ ते जुलै २०२३ या साडेपाच वर्षांच्या कालावधीत लाच घेतल्याप्रकरणी २२ जणांवर रंगेहाथ पकडण्यात आले. या सर्वांवर कारवाई करून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
''महापालिकेच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी कोणाचीही अडवणूक करू नये. काम करताना त्यांच्यावर दबाव येत असेल तरी वरिष्ठांकडे त्याची तक्रार करावी. - सचिन इथापे, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग''