... तर आदिवासी स्वसंरक्षण कसे करू शकतील?
By admin | Published: December 22, 2014 11:29 PM2014-12-22T23:29:23+5:302014-12-22T23:29:23+5:30
भीमाशंकर अभयारण्यात राहणारा आदिवासी पिढ्यान्पिढ्या येथील जंगलात राहत आहे. जंगलातील कंदमुळे खाऊन शिकारी करून हा आदिवासी समाज वाढला
भीमाशंकर : भीमाशंकर अभयारण्यात राहणारा आदिवासी पिढ्यान्पिढ्या येथील जंगलात राहत आहे. जंगलातील कंदमुळे खाऊन शिकारी करून हा आदिवासी समाज वाढला आहे. या लोकांनी जंगल राखले, प्राणी वाढवले. जंगलात फिरताना त्यांच्याकडे स्वसंरक्षणासाठी कुऱ्हाड, कोयते नसतील, तर ते त्यांचे स्वसंरक्षण कसे करू शकतील? वन विभागाने आदिवासी शेतकऱ्यांना अटक करून त्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणली असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या कुसुमताई कर्णिक यांनी सांगितले.
कुसुमताई कर्णिक गेली ३५ वर्षे आंबेगाव, जुन्नर, खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात काम करीत आहेत. भीमाशंकर अभयारण्य घोषित झाल्यापासून येथील गावांच्या हक्कासाठी त्यांनी लढा दिला आहे. अभयारण्यातील गावे उठवली जाऊ नयेत, यासाठी त्यांनी आंदोलने केली आहेत. पिंपरगणे येथील पाच शेतकऱ्यांना शिकारीसाठी जात असल्याप्रकरणी अटक करण्यात असल्याचे त्यांना समजताच या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी कुसुमताई कर्णिक यांनी घोडेगाव येथे येऊन येथील ग्रामस्थांशी चर्चा केली.
या वेळी कुसुमताई कर्णिक म्हणाल्या, की जंगलात राहणाऱ्या माणसाला जंगलाचे कायदे चांगले समजतात. त्यामुळे जंगलात राहणारा आदिवासी शिकार करतो, यात चूक मानता येणार नाही. कायदे आत्ता झाले आहेत. हे आदिवासी पिढ्यान्पिढ्या जंगलात राहत आहेत. जंगलातील कंदमुळे खाऊन शिकारी करून हा आदिवासी समाज वाढला आहे. या आदिवासींनीच जंगल राखले, प्राणी वाढवले.
शासन कु ऱ्हाडबंदी, कोयताबंदी करेल, पण जंगलात राहणाऱ्या माणसाकडे ही हत्यारे पाहिजेतच. शहरात कोणी कुऱ्हाड, कोयता घेऊन फिरले तर ठीक नाही; मात्र जंगलात राहणाऱ्या माणसाकडे ही हत्यारे नसतील, तर तो त्याचे संरक्षण करू शकत नाही. जंगलात फिरताना झाड आडवं आलं, तर त्याची फांदी तोडावीच लागते.
भीमाशंकर अभयारण्यात असणारी गावे पूर्वीपासून आहेत. येथील गावांना शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. अभयारण्य जाहीर झाल्यानंतर येथील गावांना उठवण्याचे कारस्थान चालले होते. परंतु, आम्ही ते हाणून पाडले. लोक स्वत:हून जंगलातून निघून जावेत, यासाठी वन विभाग अशा प्रकारे त्रास देत आहे. महिला कोयता घेऊन फिरल्या, तर त्यांचे कोयते जप्त केले जातात, हा कोणता कायदा.
पिंपरगणे गावाजवळच वाघोबाचे देऊळ आहे. वाघाबरोबरच राहायचे तर कसे राहावे, याची चांगली समज या लोकांमध्ये आहे. वन विभागाने ही कारवाई करून त्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणली आहे, असे कुसुमताई कर्णिक म्हणाल्या. (वार्ताहर)