राज ठाकरे अन् माझं नातं किती घठ्ठ आहे?; वसंत मोरेंनी जूना बॅनरच काढून दाखवला, पाहा Video
By मुकेश चव्हाण | Published: December 10, 2022 11:16 AM2022-12-10T11:16:59+5:302022-12-10T11:30:59+5:30
वसंत मोरे यांनी आज फेसबुकवर पोस्ट करत प्रत्युत्तर दिलं.
मनसेचे नेते वसंत मोरे पुन्हा एकदा चर्चेत आहेत. वसंत मोरे गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत. त्यांनी माध्यमांसमोर उघड नाराजी बोलावून दाखवली होती. त्यानंतर शुक्रवारी मनसेचे नेते अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना वसंत मोरे यांना बोलावून त्यांची समस्या जाणून घेतली होती.
अमित ठाकरेंची भेट घेतल्यानंतर वसंत मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अमित ठाकरेंना मी माझी अडचण सांगितली आहे. माझ्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. आता पुण्यातील कोअर कमिटीसोबत अमित ठाकरे बोलणार असून, माझी ते बाजू मांडणार असल्याची माहिती वसंत मोरे यांनी दिली. मात्र मनसेचे नेते बाबू वागस्कर यांनी वसंत मोरे चुकीची माहिती देत असल्याचं सांगितलं. तसेच वसंत मोरे यांनी माध्यमाशी बोलण्याअगोदर कोअर कमिटीमध्ये बोलावं, असंही बाबू वागस्कर म्हणाले.
बाबू वागस्कर यांनी मोरे यांच्या ताकदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच, वसंत मोरे यांना आलेल्या ऑफर माध्यमांनी तपासाव्यात, असेही वागस्कर यांनी म्हटले आहे. तसेच वसंत मोरे ताकदवान, हे ठरवणारे तुम्हीच आहात, असा चिमटाही बाबू वागस्कर यांनी माध्यमांना काढला. यावर वसंत मोरे यांनी आज फेसबुकवर पोस्ट करत प्रत्युत्तर दिलं.
वसंत मोरे पोस्टद्वारे म्हणाले की, मागच्या महिन्यात एका कार्यक्रमा नंतर मांडव वाल्याने राज ठाकरे आणि माझे मांडवातले २ उभे बॅनर काढले आणि एकमेकांना समोरासमोर बांधले. दुपारी अमित ठाकरेंना भेटून आल्यानंतर म्हणलो, माझ्यावर प्रश्न चिन्ह उभे करणारांना उत्तर द्यावे, म्हणून ते बॅनर शोधून काढले आणि म्हणलो ते ऑफिसला लावून टाकावेत म्हणजे सर्वांना उत्तरे मिळतील...पुढे काय झाले ते तुम्हीच पहा..., असं वसंत मोरेंनी व्हिडिओ पोस्ट करत म्हटलं आहे.
दरम्यान, वसंत मोरेंनी माध्यमांशी बोलताना जाहीर नाराजी बोलावून दाखवली होती. पुणे शहरातील पक्षामधून मला डावलंल जातंय. मला लक्ष्य केलं जातंय. मला पक्षाच्या कुठल्या कार्यक्रमाला बोलावलं जात नाही. तरीसुद्धा मी कार्यक्रमाला जातो. मला स्टेजवर बसवलं जातं, मात्र भाषणासाठी वेळ दिला जात नाही. या सगळ्या गोष्टी मी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना सांगितल्या आहेत, असं वसंत मोरेंनी सांगितलं होतं असं वसंत मोरेंनी स्पष्ट केलं होतं.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"