रस्ता ओलांडायचा तरी कसा ?
By admin | Published: May 1, 2017 03:04 AM2017-05-01T03:04:24+5:302017-05-01T03:04:24+5:30
पादचारी रस्त्यावरचा राजा मानले जाते. प्रत्यक्षात हा राजा रोजच जीव मुठीत धरून रस्त्यावर वावरताना दिसतो. शास्रीनगर
चंदननगर : पादचारी रस्त्यावरचा राजा मानले जाते. प्रत्यक्षात हा राजा रोजच जीव मुठीत धरून रस्त्यावर वावरताना दिसतो. शास्रीनगर, रामवाडी, विमाननगर, चंदननगर, खराडी बायपास चौकात पादचाऱ्यांची कुचंबणा होताना दिसत आहे. नगर रस्त्यावरील वाहनचालक झेब्रा क्रॉसिंगवरच वाहन थांबवित असल्याने पादचाऱ्यांना रस्ता ओलांडायचा कोठून, असा प्रश्न नगर रस्त्यावर निर्माण झाला आहे.
या गजबजलेल्या रस्त्यांवर नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात येत आहे. वाहतूक पोलिसांकडून अनेकदा कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, काही काळाने परिस्थिती ‘जैसे थे’ होते. या सर्व ठिकाणी वाहतूक पोलीसही फक्त बघ्याची भूमिका घेताना दिसत आहेत.
या सर्व चौकांतील सिग्नलवर एका बाजूला झेब्रालाइन पुसट झालेली आहे, तर दुसऱ्या एका बाजूला झेब्रा लाइनच दिसत नाहीय, अशी परिस्थिती नगर रस्त्यावरील सर्व ठिकाणी असल्यामुळे वाहने सर्रास झेब्रालाइनच्या पुढे येऊन थांबतात.
रिक्षाचालकांनाही नियमांचे वावडे असल्याचे दिसून येते. सिग्नल तर पाळतच नाही याउलट नियमांचे पालन करणाऱ्यांनाच रिक्षाचालक दमबाजी करतात.
(वार्ताहर)
2012 साली नगर रस्त्यावर बीआरटी मार्गाचे काम सुरू झाले मात्र, ते काम सुरू झाल्यानंतर नगरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी चौकांतच यावे लागले. आजवर दोनशेंहून अधिक पादचारी अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.
नगर रस्त्यावर येरवड्यापासून ते खराडी जकात नाक्यापर्यंत शंभरहून अधिक पादचाऱ्यांचे बळी गेले आहेत.
नगर रस्त्यावर वाहतूककोंडी सोडविण्यासाठी सध्या वाहतूक पोलिसांचे संख्याबळ खूपच कमी पडत आहे. येरवड्यापासून ते खराडी जकात नाका तसेच खराडी बायपास ते मुंढवा पुलापर्यंत प्रचंड कोंडी होत आहे आणि ही कोंडी सोडविण्यासाठी सध्या पोलिसांचे संख्याबळ कमी पडत असल्याने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याने यात पादचाऱ्यांना त्यांचा जीव गमवावा लागत आहे.