पूजा मृत्यू प्रकरणात मंत्र्यांचे नाव आले कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:13 AM2021-02-16T04:13:48+5:302021-02-16T04:13:48+5:30
प्राची कुलकर्णी लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूवरून संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. या प्रकरणाशी ...
प्राची कुलकर्णी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूवरून संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. या प्रकरणाशी शिवसेना आमदार आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा संबंध नसल्याचा दावा पूजाच्या वडिलांनी ््््््केला आहे. सोशल मीडियात मात्र त्यांच्या नावाचीच जोरदार चर्चा पूजाच्या मृत्यूनंतर सुरू आहे. स्वत: राठोड अजूनही गायब असल्याने यातले गूढ उकलण्यास तयार नाही.
विरोधी पक्ष भाजपाने संजय राठोड यांच्या चौकशीची मागणी सातत्याने लावून धरली आहे. पण मुळात या प्रकरणात शिवसेना मंत्री संजय राठोड यांचे नाव आले कसे या संदर्भात ‘लोकमत’ने स्थानिकांशी संवाद साधला.
पूजा ज्या हडपसर भागातील सदनिकेत राहात होती, त्याच परिसरातल्या एका राजकीय पुढाऱ्याने सांगितले की, या संपूर्ण प्रकरणात संजय राठोड यांचा सहभाग असल्याची कबुली पूजासोबत राहणाऱ्या अरुण राठोडनेच दिली. इतकेच नव्हे तर आपण या प्रकरणात अडकू नये यासाठी त्यानेच ऑडिओ क्लिप्स भाजपाच्या नेत्यांकडे दिल्या. या स्थानिक पुढाऱ्याच्या म्हणण्यानुसार, पूजाचा मृत्यू ज्या ठिकाणी झाला त्या घटनास्थळापासून त्यांचे घर जवळच आहे. रात्री जोरात आवाज झाल्याने ते आणि त्यांच्या पत्नीने काय झाले आहे हे घरातूनच पाहण्याचा प्रयत्न केला. या वेळी एका झाडाआड दोन मुलांची गडबड सुरु असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
या दोघांची हालचाल संशयास्पद वाटल्याने हे पुढारी आणि त्यांची पत्नी तातडीने त्या ठिकाणी धावले. तिथे पोहोचल्यानंतर त्यांना एक तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तिच्या बाजूलाच या प्रकरणात नाव आलेले ‘अरुण’ आणि ‘विलास’ हे दोन तरुण उभे असल्याचे दिसले. या पुढाऱ्यांनी रिक्षाचालक मित्राला बोलावून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलीला या दोन तरुणांसह दवाखान्यात उपचारांसाठी पाठवून दिले. घटना गंभीर आणि संशयास्पद वाटल्याने त्यांनी या संदर्भात पोलीस कंट्रोल रूमला फोन करुन माहिती दिली.
त्यानंतर तिथे आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत ते पुन्हा घटनास्थळी गेले. पोलिसांसोबतच त्यांनी या मुलाच्या घरातही पाहणी केली. यावेळी या घरात पूजा ज्या खोलीत राहत होती त्याचा दरवाजा बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ज्या घरात पूजा राहात होती त्या घराचे मालकही थोड्या वेळात घटनास्थळी आले. दरम्यान, पूजाला ज्या खासगी दवाखान्यात नेण्यात आले, त्याच ठिकाणी पोहोचल्यावर घरमालकांनी अरुण आणि विलासकडे चौकशी सुरु केली. अरुण आणि विलास यांनी वेगवेगळी उत्तरे दिल्याने संशय आल्याने घरमालक आणि स्थानिक पुढाऱ्याने त्यांच्याकडे आणखी चौकशी केली. त्यामुळे या प्रकरणी आपण अडकू शकतो, अशी भीती अरुण आणि विलासला वाटू लागली. त्यामुळे त्यांनी मंत्री संजय राठोड यांचे नाव घेतले, असे त्यांची चौकशी करणाऱ्या पुढाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले.
चौकट
कॉल रेकॉर्डिंग दिले
अरुणने थेट मंत्र्याचे नाव घेतल्याने त्याच्याकडे पुरावा मागितला. तेव्हा अरुणने त्याच्याकडे कॉल रेकॉर्डिंग असल्याचे सांगितले. अरुणनेच ते रेकॉर्डिंग आपल्याला दिले, असा दावा संबंधित पुढाऱ्याने ‘लोकमत’कडे केला. या पुढाऱ्याशी अरुण बोलत असतानाच त्याचा संजय राठोड यांच्याशी फोन सुरु होता. तो संपूर्ण आवाजदेखील रेकॉर्डिंगमध्ये असल्याचा दावा त्यांनी केला आहे.