ठाकरे-पवारांनी परस्पर गणेशोत्सवाचा निर्णय कसा घेतला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:09 AM2021-07-01T04:09:02+5:302021-07-01T04:09:02+5:30

गणेश मंडळांची नाराजी : चर्चा का नाही केली? अतुल चिंचली पुणे : राज्य शासनाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना ...

How did Thackeray and Pawar decide on Ganeshotsav? | ठाकरे-पवारांनी परस्पर गणेशोत्सवाचा निर्णय कसा घेतला?

ठाकरे-पवारांनी परस्पर गणेशोत्सवाचा निर्णय कसा घेतला?

Next

गणेश मंडळांची नाराजी : चर्चा का नाही केली?

अतुल चिंचली

पुणे : राज्य शासनाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव साधेपणाने साजरा व्हावा, यासाठी काही नियम व अटी लागू करण्यात आल्या. राज्य सरकारने मुंबई या एकाच शहराला डोळ्यांसमोर ठेवून ही नियमावली जाहीर केली. स्थानिक प्रशासन आणि पुण्यातल्या मंडळांशी चर्चा करून ही नियमावली का निश्चित केली नाही, अशी नाराजी पुण्यातील गणेश मंडळांनी व्यक्त केली आहे.

राज्यातील सर्वच जिल्ह्यात गणेशोत्सव वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. पुण्यातल्या गणेशोत्सवाला वैभवशाली, ऐतिहासिक परंपरा आहे. केवळ राज्यातच नव्हे तर देश-विदेशात पुण्यातला गणेशोत्सव प्रसिद्ध आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील गणेश मंडळांचे मत लक्षात घेण्याची तसदी राज्य सरकारने का घेतली नाही, असा प्रश्न गणेश मंडळांचे कार्यकर्ते व्यक्त करतात.

पुण्यातल्या गणेशोत्सवाची परंपरा अनोखी आहे. ती जपली जावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागच्या वर्षी गणेशोत्सवावर बंधने आली होती. पुण्यातल्या सर्वच गणेश मंडळांनी सामाजिक भान ठेवून गणेशोत्सव साधेपणानेच साजरा केला. पण तेव्हा प्रशासनाने गणेश मंडळांशी ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरसद्वारे संपर्क साधला होता. यंदाही मंडळे सामंजस्याने वागणार आहेत. सरकारने दिलेल्या सर्व नियमांचे पालनही करणार आहेत. पण स्थानिक पातळीवर चर्चा करण्यात सरकारला कमीपणा वाटण्याचे काय कारण, अशी भावना गणेश मंडळ कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

चौकट

“पहिल्या लाटेत गणेशोत्सव मंडळांनी समाजासाठी सर्वतोपरी मदत केली. दुसऱ्या लाटेतही समाजकार्यात सक्रिय सहभाग आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी नियोजन करणे गरजेचे आहे. राज्य शासनाचा निर्णय हा एका शहराला बघून घेण्यात आला आहे. त्यांनी मंडळांशी अथवा प्रशासनाशी चर्चा करून नियमावली जाहीर करावी. मंडळाचा प्रत्येक कार्यकर्ता समाजभान ठेवूनच काम करतो. त्यामुळे सरकारच्या कुठल्याही निर्णयाचे आम्ही स्वागत करू.”

-महेश सूर्यवंशी, कोषाध्यक्ष श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ.

चौकट

“नियमावलीत मूर्तींच्या उंचीबाबत घेतलेला निर्णय पुण्यासाठी लागू होत नाही. आत्ताच कोरोना आटोक्यात येत आहे. गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यावर आमचा भर असणार आहे. पण मंडळांशी चर्चा होणे गरजेचे होते. उत्सव जल्लोषात होणार नाहीच. पण त्यामध्ये मंडळाची मते जाणून घेता आली असती.”

-श्रीकांत शेटे, अध्यक्ष, मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

चौकट

“शासनाच्या गणेशोत्सव नियमावलीचे आम्ही स्वागतच करतो. गेल्या वर्षी मांडव टाकण्यावरून गोंधळ झाला होता तो यंदा होऊ नये ही आमची अपेक्षा आहे. रीतसर परवानगी घेऊन मांडव टाकण्यास परवानगी दिलेलीच आहे. ही नियमावली करताना स्थानिक प्रशासन तसेच गणेशोत्सव मंडळांबरोबर एकत्र बैठक घेऊन निर्णय घेतला असता तर त्यात आणखीन सुसूत्रता आणता आली असती.”

-प्रशांत टिकार, विश्वस्त, मानाचा दुसरा, श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

चौकट

“शासनाने यंदाच्या आणि मागच्या वर्षीच्या नियमात बदल केलेला नाही. कोरोना अजूनही टळला नाही. जल्लोषात उत्सव साजरा केल्यास कोरोना पुन्हा तोंड वर काढेल. पुण्यातील गणेशोत्सवावर हा ठपका बसायला नको. त्यामुळे शासनाच्या नियमांचे स्वागत आम्ही करतच आहोत. फक्त मुंबईचे गणपती पाहून सर्वांसाठी या सूचना जाहीर केल्या आहेत. याबाबत मंडळे संभ्रमात आहेत.”

-अण्णा थोरात, अध्यक्ष, अखिल मंडई मंडळ

चौकट

“गेल्या वर्षीही कोरोनाची अशीच स्थिती निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने करण्यासाठी पालकमंत्री, महापालिका आयुक्त तसेच मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाली होती. त्यानंतरच नियमावली जाहीर करण्यात आली. पुण्यात ९० टक्के मंडळांच्या गणेश मूर्ती ४ फुटांपेक्षा जास्त आहेत. आता पुढे स्थानिक प्रशासनाचे वेगळे नियम येणार. मग नक्की कुठल्या नियमांचे पालन करावे यावरुन मंडळे अडचणीत अडकली आहेत. मांडवाबाबत परवानगी दिली असूनही स्थानिक पातळीवर नियम बदलले जातात. मंडळाची मते जाणून घेतली जात नाही. सरकारने चर्चा करायला पाहिजे.”

-प्रवीण परदेशी, मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळ

चौकट

“मुंबईच्या गणेशोत्सवाचे नियम पुण्याला लागू होत नाहीत. आताचा गणेशोत्सव धार्मिक आणि सामाजिक अशा दोन्ही स्वरूपाचा आहे. कित्येक माणसांच्या उपजीविका गणेशोत्सवावर अवलंबून आहे. त्यामुळे तो साधेपणाने साजरा होईलच. तसेच मंडळाचा कार्यकर्ता शासनाच्या नियमात राहूनच उत्सव साजरा करणार आहे. पण आता जाहीर केलेल्या राज्याच्या मार्गदर्शक सूचनेत सर्वांचा विचार करून थोडाफार बदल करण्याची गरज आहे.”

विवेक खटावकर, अध्यक्ष, मानाचा चौथा, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

Web Title: How did Thackeray and Pawar decide on Ganeshotsav?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.