आरोपी कसा पळाला, इतके दिवस का होता ॲडमिट? ससूनच्या चाैकशी समितीने नाेंदविले ८० जणांचे जवाब
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 10:24 AM2023-10-16T10:24:51+5:302023-10-16T10:25:01+5:30
कैदी रुग्णांना ॲडमिट करून घेतल्याची कारणे, आजारांचे निदान, उपचार, याबाबत कसून चौकशी केली
पुणे : ससून ड्रग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने नेमलेल्या समितीने ससून रुग्णालयाला भेट देत, तब्बल ८० जणांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. आरोपी कसा पळाला, त्याला कोणी मदत केली, मुळात तो इतके दिवस का ॲडमिट होता, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सर्वांची सखाेल चाैकशी केली असून, त्याचा अहवाल लवकर येण्याची शक्यता आहे.
वैद्यकीय शिक्षण संचालक डाॅ.दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीने कैदी रुग्णांना ॲडमिट करून घेतल्याची कारणे, आजारांचे निदान, उपचार, याबाबत कसून चौकशी केली. ड्रग तस्कर ललित पाटील पळून गेल्या प्रकरणात ही समिती चाैकशी करत आहे. या समितीतील सदस्यांनी शुक्रवारी ससून रुग्णालयाला भेट दिली.
समितीने अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर यांच्यासह कैद्यांवर उपचार करणारे डॉक्टर, वॉर्डशी संबंधित कर्मचारी असे तब्बल ८० जणांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. समितीचे सदस्य दिवसभर ससून रुग्णालयामध्ये ठाण मांडून होते. यानंतर, त्यांनी कैद्यांच्या वॉर्ड क्रमांक १६ मध्येही भेट दिली. कैद्यांची कशा प्रकारे बडदास्त ठेवण्यात येते, त्यांच्यावर कशा पद्धतीने उपचार केले जातात, अशा अनेक निकषांचा अभ्यास करत सखोल माहिती जाणून घेतली.
''समितीने ससून रुग्णालयाला भेट दिली आणि संबंधितांची चौकशी केली आहे. याबाबतचा अहवाल १५ दिवसांत राज्य शासनाला सादर केला जाणार आहे, तसेच गरज भासल्यास पुन्हा एकदा ससून रुग्णालयाला भेट देऊ शकताे. - डॉ.दिलीप म्हैसेकर, संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय व अध्यक्ष चाैकशी समिती.''