आपली पत्रे लिक कशी झाली? : चंद्रशेखर यांचा वरवरा राव यांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 10:01 PM2018-10-22T22:01:17+5:302018-10-22T22:07:12+5:30
परिस्थिती आता नियंत्रणाबाहेर आहे.आपल्यातील संभाषणात अधिक गुप्तता पाळणे गरजेचे आहे, असा मेल चंद्रशेखर यांनी ४ जुलै रोजी राव यांना पाठवला होता.
पुणे : तपास यंत्रणा कोणत्या पद्धतींचा वापर करून या प्रकरणाचा तपास करत आहे? आपली पत्रे लिक कशी झाली? त्याला जबाबदार कोण आहे? असे सवाल करणारा मेल सेंट्रल कमिटेची प्रमुख चंद्रशेखर यांनी कवी वरवरा राव यांना पाठवला असल्याचे सरकारी वकिलांनी सोमवारी न्यायालयात सांगितले. त्यावर राव यांनी तंत्रज्ञान समजावून घेवू, असे उत्तर चंद्रशेखर यांना दिल्याचा युक्तिवाद करण्यात आला.
एल्गार परिषदेच्या आयोजनामध्ये माओवाद्यांचा संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या शोमा सेन, अॅड. सुरेंद्र गडलिंग, प्रा. सुधा भारद्वाज, व्हर्णन गोन्सालवीस आणि अरुण फरेरा यांच्या जामीन अर्जावर विशेष न्यायाधीश के. डी. वडणे यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पोलिसांनी सादर केलेली पत्र खोटी असल्याचा आरोप बचाव पक्षाकडून करण्यात आला आहे. मात्र हे पत्र खरे असल्याची सांगत जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी राव आणि चंद्रशेखर यांच्यात ४ ते १४ जुलै २०१८ दरम्यान झालेल्या मेलवरील संभाषणाची माहिती न्यायालयाला दिली.
दिल्ली आणि महाराष्ट्रातून पाच जणांना अटक केल्यानंतर संघटनेतील सदस्यांचे मनोबल खचले आहे. आपली पत्रे लिक कशी झाली? त्याला जबाबदार कोण आहे? तपास यंत्रणा कोणत्या पद्धतीचा वापर करीत आहे हे समजावून घेण्याची गरज आहे. आता याबाबत काय करता येवू शकते याचे नियोजन करावे. परिस्थिती आता नियंत्रणाबाहेर आहे. आपल्यातील संभाषणात अधिक गुप्तता पाळणे गरजेचे आहे, असा मेल चंद्रशेखर यांनी ४ जुलै रोजी राव यांना पाठवला होता. त्यावर राव यांनी १४ जुलैला उत्तर दिले असून त्यांच्या मेलमध्ये नमूद करण्यात आले आहे की, संदेशांमध्ये गुप्तता ठेवण्यासाठी काय करता येईल याबाबत विद्यार्थ्यांकडून माहिती घेत आहे. पोलिसांच्या तपासाबाबत अहवाल करून त्याची माहिती पुरविण्यात येईल. तसेच यापुढे वैयक्तिक मोबाइल फोन आणि संगणकांच्या वापरासाठी अधिक कठोर नियम ठेवण्यात येतील. असा संवाद या मेलमध्ये आहे. सुधा भारद्वाज यांच्याविरूध्द पाच पत्रे समोर आली आहेत. ती न्यायालयासमोर ठेवण्यात आली आहे. सध्या हे प्रकरण पुरव्याच्या पातळीवर नसून तपासाच्या पातळीवर असल्याने आरोपींचा जामीन फेटाळावा अशी मागणी अॅड. पवार यांनी केली.
...........................
तपास भरोसा ठेवण्यासारखा नाही
न्यायालयात सादर करण्यात आलेली पत्र तपाण्यात आलेली नाही. पत्राच्या प्रती माध्यमांना मिळतात मात्र त्याची एकही प्रत पोलीस न्यायालयात वकीलांना दाखवत नाही. त्यामुळे पोलिसांचा तपास भरोसा ठेवण्यासारखा नाही. तर मिलिंद एकबोटेंवर युएपीए अंतर्गत गुन्हा का दाखल करण्यात आला नाही, असा सवाल करीत सुधा भारद्वाज यांच्यावकील अॅड. रागिनी अहुजा यांनी जामीन मंजूर करावा, अशी मागणी केली.