महाविद्यालयात आम्ही यायचं कसं?

By admin | Published: April 12, 2016 04:35 AM2016-04-12T04:35:32+5:302016-04-12T04:35:32+5:30

शैक्षणिक संस्थांनी अपंग विद्यार्थ्यांना शैक्षणिक संकुलात अडथळाविरहित वातावरणाबरोबरच रॅम्प, लिफ्ट, स्वच्छतागृह आदी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे स्पष्ट आदेश

How do we come to college? | महाविद्यालयात आम्ही यायचं कसं?

महाविद्यालयात आम्ही यायचं कसं?

Next

पुणे : शैक्षणिक संस्थांनी अपंग विद्यार्थ्यांना शैक्षणिक संकुलात अडथळाविरहित वातावरणाबरोबरच रॅम्प, लिफ्ट, स्वच्छतागृह आदी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आहेत. मात्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील काही इमारती आणि विद्यापीठाशी संलग्न अनेक महाविद्यालयांमध्ये आजही अपंगांसाठी आवश्यक सुविधा नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी अपंग विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार देशातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये अपंगांना विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सोई-सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने, राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने तसेच अपंग कल्याण आयुक्त कार्यालयाने वेळोवेळी याबाबत परिपत्रक काढून निर्देश दिले होते. तसेच गेल्या दोन वर्षांपासून कोणत्या महाविद्यालयांनी सुविधा पूर्ण केल्या नाहीत, याबाबतचा अहवालही तयार केला जात आहे.
पुणे विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे डिसेंबर २०१५ मध्ये प्राप्त झालेल्या माहितीनुसार पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील १६७ अनुदानित महाविद्यालयांपैकी १४९ महाविद्यालयांनी रॅम्प आणि स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विद्यापीठ व महाविद्यालयांकडून अपंग विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने यूजीसीने पुन्हा एकदा सर्व विद्यापीठांना याबाबत सूचना केल्या आहेत. तसेच येत्या महिन्याभरात कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गेल्या काही वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या इमारतीमध्ये व वसतिगृहांमध्ये अपंग विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सोई-सुविधांचा विचार करण्यात आला आहे. मात्र, जुन्या इमारती व वसतिगृहात अपंग विद्यार्थ्यांना वापरता येतील, अशी स्वच्छतागृहे तयार केली नाहीत. त्याचप्रमाणे जुन्या इमारतींच्या सर्व बाजूच्या प्रवेशद्वाराजवळ अद्याप रॅम्प बसविण्यात आले नाहीत. विद्यापीठ परिसरात केवळ एकच लिफ्ट सुरू आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला ग्रंथालयामध्ये पुस्तके घेण्यासाठी जावे लागते. मात्र, अनेक ग्रंथालयांच्या जवळ रँप बसविण्यात आले नाहीत. त्यामुळे अपंग विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच महाविद्यालय व विद्यापीठांनी केवळ विद्यार्थीच नाही तर अपंग कर्मचाऱ्यांनाही सुविधा देणे बंधनकारक आहे.

सुविधा देण्याबाबत महाविद्यालयांची अनास्था
विद्यापीठ व उच्च शिक्षण विभागाने महाविद्यालयांकडून अपंगांना सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत अहवाल मागविला होता. त्यात शिरूरजवळील पाबळ येथील महाविद्यालयाने आमच्याकडे अपंग विद्यार्थी नसल्यामुळे सुविधा उपलब्ध केल्या नाहीत, अशी माहिती कळविली आहे, तर काही महाविद्यालयांकडून गेल्या दोन वर्षांपासून रॅम्प व स्वच्छतागृह बांधण्याचे काम सुरू असल्याचे कळविले जात आहे. त्यामुळे अपंग विद्यार्थ्यांना सुविधा देण्याबाबत अनास्था दिसून येत आहे.

पुणे विभागीय उच्च शिक्षण विभागाकडून पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांना अपंग विद्यार्थ्यांना सुविधा देण्याबाबत परिपत्रक पाठविले आहे. त्यात १९९५ च्या अपंग कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अपंगांचा अनुशेष भरण्यात यावा, अपंगांकरिता महाविद्यालयात रॅम्प बार, टॉयलेट, बाथरूम आदी सुविधा पुरविण्यात यावी, अपंगांना देय असणाऱ्या ३ टक्के आरक्षणाची उर्वरित कार्यवाही करण्यात यावी, अपंग विद्यार्थ्यांना महाविद्यालये, शाळा, वसतिगृहामध्ये प्रवेशाबाबत ३ टक्के प्रवेशाबाबत कार्यवाही करावी, असे नमूद करण्यात आले आहे.


विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयातर्फे विद्यापीठ व सर्व अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालयांना अपंग विद्यार्थ्यांना आवश्यक सोई-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यासंदर्भातील अहवालही मागविला आहे.
- डॉ. विजय नारखेडे, सहसंचालक, उच्च शिक्षण,
पुणे विभाग

Web Title: How do we come to college?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.