नव्याला साद घालताना जुनं विसरून कसं चालेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 03:55 AM2018-04-29T03:55:13+5:302018-04-29T03:55:13+5:30

नवीन पोरी नजर लागावी इतकं छान नाचतात. त्यांची कला मायबाप रसिकाला पसंत पडती. नाचण्यातला वेग, ताल, लय यांची त्यांना असलेली समज बघून चकित व्हायला होतं.

How do you forget to forget about old age? | नव्याला साद घालताना जुनं विसरून कसं चालेल?

नव्याला साद घालताना जुनं विसरून कसं चालेल?

googlenewsNext

नवीन पोरी नजर लागावी इतकं छान नाचतात. त्यांची कला मायबाप रसिकाला पसंत पडती. नाचण्यातला वेग, ताल, लय यांची त्यांना असलेली समज बघून चकित व्हायला होतं. पण हे सगळं असताना त्यांच्याकडे आपल्या नृत्यपरंपरेची शिदोरी म्हणावी तितकी नसल्याने काहीबाबतीत उणिवा जाणवतात. कलेच्या क्षेत्रातील वाढती स्पर्धा, त्यातून निर्माण होणारे संघर्ष हे पाहता आपल्या नावाचा ब्रँड तयार करण्यासाठी जुन्याचा बाज, थाट आणि सौंदर्य गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ज्येष्ठ नृत्यांगना छाया-माया खुटेगावकर या बहिणींशी केलेली बातचीत...

रंगमंचावर कला सादर करताना वीस-पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला हे कळलेच नाही. या प्रवासादरम्यान अनेक थोरामोठ्यांचा, दर्दी रसिकांचे मार्गदर्शन लाभले. आता ज्यांना नाचण्या गाण्यांची आवड आहे त्यांच्याकरिता विविध क्लासेस उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यात शिकून नाचगाणं शिकता येते. नवीन मुलींना ज्या वेळी नाचताना बघतो तेव्हा त्यांच्यात नृत्यातल्या अनेक नवीन गोष्टी पाहावयास मिळतात. परंतु जुन्याची गंमत त्यात नसते. ते त्यांना शिकवले जात नाही. याची खंत वाटते. आम्ही दोघी बहिणी महिन्याला १२ ते १४ कार्यक्रम करायचो. आज वयाने पन्नाशी पार केली आहे. डॉक्टरांनी नृत्य करण्यास मनाई केली आहे. पायात घुंगरू बांधले, की गुडघे बोलायला लागतात. कला, त्या कलेप्रती निष्ठा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रसिकाचे निखळ मनोरंजन करणे हे साधं सोपं तत्त्व नेहमीच लक्षात ठेवलं. त्यामुळे नृत्याशी संबंधित नवीन संकल्पना समजून घेताना फारसा त्रास काही झाला नाही. आता कार्यक्रम वाढले. यात्रा, जत्रा यानिमित्ताने रसिक लावणी, तमाशा कार्यक्रमांची मेजवानी पाहावयास मिळते. कार्यक्रमातील नवीन नृत्यांगनांना प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद तर मिळतेच. परंतु जुन्या लावण्यांची फर्माईश केली जाते, अशा प्रसंगी नवोदित कलाकार काही अंशी कमी पडताना दिसतात. याचे कारण असे, की त्यांना आपल्या पारंपरिक लावणीविषयीचे असलेले कमी ज्ञान, त्यांना शाहीर पठ्ठे बापूराव, शाहीर छगनभाऊ, अनंत फंदी, भाऊ फक्कड माहिती होणार कसे? त्यांच्या लावण्या त्यांना कशा कळणार? मुंबई विद्यापीठात लोककला विषयावर शिकवण्याची संधी मिळते, तेव्हा विद्यार्थ्यांना लावणीचा इतिहास, त्याच्यातील गमतीजमती हे सगळे बारकाईने सांगता येते.
नवीन कलाकारांनी सध्याच्या प्रेक्षकवर्गाला काय पाहिजे ? याचा अभ्यास करायला हवा. सगळं कलावंतांच्या मनाप्रमाणे कसे होईल? रसिक जेव्हा आनंदाने तुमच्या कलेला दाद देईल त्या वेळी तुमच्या कलेचे समाधान होते. दरवेळी प्रेक्षकांना दोष देण्यात काय अर्थ आहे? २००२ पासून कारभारी दमानं नावाचा कार्यक्रम दोघी बहिणींनी सुरू केला. कार्यक्रमाचे हजारो प्रयोग झाले. हाऊसफुल्लचा बोर्ड लागला. मात्र रसिकांच्या टाळ्या अन् शिट्ट्या वाजल्याविना या कार्यक्रमाचा पडदा कधी पडला नाही. कलेबरोबर पारंपरिकतेचा वसा आणि वारसा त्या कलावंताला जपता यायला पाहिजे. आता आठवतं त्या वेळी डोळ्यात पाणी उभे राहते. आई रुक्मिणीबाई, थोरली बहीण विजया खुटेगावकर यांनी गायन आणि नृत्याचे धडे दिले. त्यांच्या तालमीत पारंपरिक , नवता यांचे मिश्रण पाहावयास मिळते. रियालिटी शोचा जमाना आहे. त्यात नवनवीन गाणी, त्याबरोबरीने डान्स बघायला मिळतो. त्यातील नृत्यकला अप्रतिम आहे. परंतु त्यात जुनं काय आहे? हा प्रश्न पडतो. कलावंत त्याचे प्रश्न याविषयी शासनाकडे मागण्या आम्ही करतो. आमच्या विविध कलावंत संघटनादेखील करतात. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतोदेखील. दरवेळी त्यांच्याकडून तातडीने पदरात काही पडेल, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. सरकारी काम आहे. त्यामुळे त्या यंत्रणेला वेळ लागणार हे कलाकारांनी समजून घ्यायला हवे.
सध्या यात्रा, जत्रेनिमित्ताने आमच्यासारख्या कलावंतांना रसिक सेवेची संधी देतात यात खरे तर त्या काळातील नृत्य, लावणी यांचा वाटा महत्त्वाचा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजनाच्या क्षेत्रात काम करीत असताना आम्ही या क्षेत्रातील बदलांचा स्वीकार तर केलाच, परंतु त्याचबरोबर नव्याला साद घालताना जुन्याचं मोठेपण विसरलो नाही.

Web Title: How do you forget to forget about old age?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.