'मातोश्री'वर बसून सामान्यांचा त्रास कसा कळणार ? चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 04:37 PM2021-03-29T16:37:29+5:302021-03-29T16:38:32+5:30
ठाकरे सरकार जर कोरोनाच्या नावाखाली लॉकडाऊन करणार असेल तर त्याला आमचा कडवा विरोध असेल..
पुणे : राज्य शासन सर्वसामान्यांना एक रुपयांचेही पॅकेज देणार नाही़ मात्र, कोरोनावर नियंत्रणाच्या नावाखाली राज्य शासन जर लॉकडाऊन लागू करणार असेल, तर त्याला आमचा कडवा विरोध असेल, अशी भूमिका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मांडली. मातोश्रीवर बसून लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांना होणारा त्रास कसा कळणार, असा टोला पाटील यांनी लगावला़.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची आयुक्तालयात चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पाटील यांनी सांगितले की, कोरोनाच्या वाढत्या संख्येवर लॉकडाऊन हे उत्तर नाही. लॉकडाऊननंतर गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारने एक रुपयांचे पॅकेज जाहीर केले नाही. लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो, हे मातोश्रीमध्ये बसून कळणार नाही.
गेल्या दोन तीन महिन्यांपासून जनजीवन पूर्वपदावर येत असताना राज्य सरकार पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याच्या मानसिकतेत असेल तर त्याला आमचा विरोध असेल. देशाच्या अर्थव्यवस्थेत असंघटित कामगारांचे मोठे योगदान आहे़ लॉकडाऊन लागू केले तर त्याचा सर्वाधिक फटका हा असंघटित वर्गालाच बसेल. त्यामुळे त्यांनी अगोदार असंघटित क्षेत्रातील हातावर पोट असणार्यांना पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली.
.........
पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचे पालन
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाल्याचे वृत्ताबाबत चंद्रकांत पाटील यांनी सांगितले, की भारतीय राजकारणात सत्ताधारी, विरोधक हे एकमेकांना भेटत असतात. त्यात वेगळे काही नाही. राज्यात काही बदल होण्याची शक्यता नाही. पक्षश्रेष्ठी जो काही आदेश देतील त्याचे राज्यात पालन केले जाते.