कसा मिळतो एनडीएत प्रवेश ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:09 AM2021-04-01T04:09:53+5:302021-04-01T04:09:53+5:30
एनडीएच्या परीक्षेची पात्रता : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत दाखल होण्यासाठी बारावीत शिकणारा किंवा बारावी उत्तीर्ण झालेला १६ वर्षे ६ महिने ...
एनडीएच्या परीक्षेची पात्रता :
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत दाखल होण्यासाठी बारावीत शिकणारा किंवा बारावी उत्तीर्ण झालेला १६ वर्षे ६ महिने ते १८ वर्षे ६ महिने वयोगटांतील कोणत्याही शाखेचा विद्यार्थी या परीक्षेस प्रात्र असतो. मात्र, नौदल किंवा हवाई दलात जाण्यासाठी बारावीत विज्ञान शाखा असणे अनिवार्य आहे.
अर्ज भरण्याची प्रक्रिया : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत केवळ मुलांनाच प्रवेश दिला जातो. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ही परीक्षा वषार्तून दोनदा घेतली जाते. साधारणत: एप्रिल आणि सप्टेंबर महिन्यात ही परीक्षा होते. परीक्षेच्या एक महिना आधी अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सुरू होते. या वर्षी ही परीक्षा १८ एप्रिल आणि ५ सप्टेंबरला होणार आहे. १८ एप्रिलला होणाऱ्या परीक्षेला अर्ज करण्याची मुदत संपली आहे. यामुळे ५ सप्टेंबरला होणाऱ्या परीक्षेची तयारी मुलांना करता येणार आहे. येत्या ९ जूनला या परीक्षेला प्रविष्ट होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत २९ जून आहे. अर्ज करताना लष्कर, हवाई दल आणि नौदलाचा प्राधान्यक्रम द्यावा लागतो.
परीक्षेचे स्वरुप : लेखी परीक्षा ही अकरावी-बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असते. पहिला पेपर हा गणितावर आधारित १२० प्रश्नांचा असतो. पेपर सोडवण्यासाठी अडीच तासांचा वेळ दिला जातो. या पेपरसाठी ३०० गुण असतात. दुसरा पेपर हा जनरल अॅबिलिटी टेस्टवर आधारित असतो. हा पेपर दोन भागांत होतो. पहिल्या भाग (ए सेक्शन) हा ५० गुणांचा पेपर असतो. यात इंग्रजी व्याकरणावर आधारित ५० प्रश्न विचारले जातात. २०० गुणांचा हा पेपर असतो. तर, दुस-या भागात (सेक्शन बी) संमिश्र प्रश्न असतात. यात १०० प्रश्न असतात. हे प्रश्न इतिहास, भूगोल, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि चालू घडामोडींवर प्रश्न विचारले जातात. हा पेपर ४०० गुणांचा असतो. हे दोन्ही पेपर ६०० गुणांचे असून पेपर सोडवण्यासाठी अडीच तासांचा कालावधी दिला जातो.लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर या प्राधान्य क्रमांकानुसार मुलांना एसएसबी मुलाखतीसाठी बोलवण्यात येते.
एसएसबी मुलाखती : लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना एसएसबी मुलाखतीसाठी बोलवण्यात येते. ही परीक्षा व मुलाखतीची प्रक्रिया पाच दिवसांची असते. पाच दिवसांत लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या विविध परीक्षा आणि चाचण्या घेतल्या जातात. ही प्रक्रिया दोन भागांत पार पडते. पहिल्या भागाला एसएसबी स्टेज वन, तर दुसऱ्या भागाला एसएसबी स्टेज २ संबोधले जाते. एसएसबी मुलाखतीच्या पहिल्या दिवशी प्राथमिक चाचण्या होतात. ही चाळणी प्रक्रिया असते. सर्वप्रथम मुलांची बुद्धिमत्ता चाचणी घेतली जाते. याव्यतिरिक्त आणखी एक चाचणी पहिल्या दिवशी घेतली जाते. या चाचणीला पिक्चर परसेपशन अॅन्ड डिस्कशन टेस्ट (पीपीडीटी) असे म्हणतात. ही चाचणी अतिशय महत्त्वाची असते. या परीक्षेत ग्रुप डिस्कशन, एखादे चित्र दाखवून त्यावर निबंध अथवा गोष्ट लिहायची असते. प्रत्येकाने तो निबंध अथवा गोष्ट ही सर्वांसमोर सांगायची असते. त्याचे विश्लेषण करायचे असते. यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या गुणांचे परीक्षण केले जाते. या चाचणीत जवळपास ७० ते ७५ टक्के मुले अपात्र होतात.
दुसऱ्या टप्प्याच्या मुलाखती : पहिल्या टप्प्यातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीला सायकॉलॉजीकल टेस्ट घेतली जाते. दोन तासांची ही लेखी परीक्षा चाचणी असते. तिसऱ्या आणि चवथ्या दिवशी जीटीओ परीक्षा घेतली जाते. यात सामूहिक परीक्षा घेतली जाते. ग्रुप टेस्टिंग ऑफिसर ही परीक्षा घेतो. यात ६ ते १० जणांचा ग्रुप केला जातो. त्याच्या विविध चाचण्या घेतल्या जातात. ग्रुप डिक्सशन, स्नेक रेस घेतले जाते. यातून मुलांमध्ये नेतृत्व गुण आहेत का? अधिकारी बनण्याची क्षमता, समूह सांभाळण्याची क्षमता आहे का? हे पाहिले जाते.
पाचव्या दिवशी सकाळी एक कॉन्फरन्स होते. या कॉन्फरन्समध्ये विद्यार्थ्यांची ओळख सर्व परीक्षकांना होतो. यात जुजबी प्रश्न विचारले जातात. साधारण २ ते ३ मिनिटांची मुलाखत होते. सर्व विद्यार्थ्यांच्या मुलाखती या एकापाठोपाठ घेतल्या जातात. हा एसएसबीच्या दुसऱ्या भागाचा शेवटचा टप्पा असतो. साधारणता दोन तासांनंतर सर्व मुलांना एकत्र एका रूममध्ये बसवले जाते आणि एक अधिकारी येऊन निकाल जाहीर करतो. यात एसएसबी पात्र झालेल्यांची नावे जाहीर केले जातात. यानंतर लेखी परीक्षेत मिळालेले गुण आणि एसएसबी परीक्षेत मिळालेल्या गुणांवरून मेरिट काढण्यात येते. त्यानुसार साधारणता: संपूर्ण देशातून केवळ ३७० ते ४०० मुलांची निवड राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीसाठी केली जाते.
- निनाद देशमुख, उपसंपादक, लोकमत, पुणे