आत्महत्येसाठी गावठी कट्टा आला कोठून?
By admin | Published: April 19, 2017 04:13 AM2017-04-19T04:13:21+5:302017-04-19T04:13:21+5:30
शहरात १७ वर्षीय मुलीने गावठी कट्ट्याने गोळी झाडून आत्महत्या केल्याच्या घटनेला ७२ तास उलटले आहेत. त्यानंतरदेखील या घटनेचे गूढ कायम आहे.
बारामती : शहरात १७ वर्षीय मुलीने गावठी कट्ट्याने गोळी झाडून आत्महत्या केल्याच्या घटनेला ७२ तास उलटले आहेत. त्यानंतरदेखील या घटनेचे गूढ कायम आहे. पोलिसांच्या हाती अद्याप कोणतेही धागेदोरे हाती लागले नाहित. मंगळवारी (दि. १८) सायली बळी हिच्या आई-वडिलांनी गावठी कट्ट्याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितल्याने हे प्रकरण संशयास्पद बनले आहे. त्यामुळे पोलिसांनादेखील गावठी कट्टा आला कसा, याचा तपास लागल्यानंतरच ‘तिच्या आत्महत्येचे’ गूढ उकलणार आहे.
सोमवारी (दि. १७) या घटनेची चौकशी करण्याची मागणी शिवसेना उपनेत्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. त्यामुळे या घटनेला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे. याबाबत गोऱ्हे यांनी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. शनिवार (दि. १५) बारामती शहरातील सूर्यनगरी भागात सायली ऊर्फ संध्या मानसिंग बळी या १७ वर्षीय मुलीने गावठी कट्ट्याने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. सायलीने सामाजिक व विविध प्रकारच्या दबावातून प्राप्त झालेल्या नैराश्यातून आत्महत्या केली असावी, असा अंदाज गोऱ्हे यांनी व्यक्त के ला आहे. तसेच गावठी कट्ट्याबाबत तपास करण्याची मागणीदेखील केली आहे. तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांनी सांगितले, की बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात पिस्तूलबाबत सायलीच्या आई-वडिलांकडे आज चौकशी करण्यात आली. मात्र, सायली हिच्याकडे आत्महत्या करण्यासाठी रिव्हॉल्व्हर कोठून आले, याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे तिच्या आई-वडिलांंनी सांगितले.