कितीतरी मोदी येतील अन् जातील; पण मी 'मनु'वाद अन् 'मनी'वादाला घाबरणार नाही: बी.जी.कोळसे पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 09:55 PM2021-01-30T21:55:06+5:302021-01-30T21:57:01+5:30
आपण प्रश्न केले नाहीत तर घरात सडून मरू. प्रश्न विचारले तर ताकद निर्माण होईल..
पुणे : जात, पंथ, धर्म, नेता आपले शोषण करत आहेत. या व्यवस्थेला मोडले पाहिजे. मनुवादाला संपवले पाहिजे. पण तीच दिवसेंदिवस प्रबळ होत चालली आहे. आपले नेता आपल्याला पुढे येऊ देत नाहीत. मी पोलीस, मरणाला घाबरत नाही. कितीतरी मोदी येतील अन् जातील पण 'मनु'वाद आणि 'मनी'वादाला घाबरणार नाही. आपण सर्वजण शेवटच्या श्वासापर्यंत अन्यायाविरुद्ध लढत राहू, असे मत निवृत्त न्यायाधीश बी.जी. कोळसे पाटील यांनी व्यक्त केले.
पुण्यात स्वारगेट गणेश कला क्रीडा मंच येथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कोळसे पाटील म्हणाले,
आपण मालक होऊ शकत नाही कारण आपण संघटित नाही..ही नवी पेशवाई काय आहे? असा प्रश्न मला विचारला जातो.. 'ते' बरोबर नियोजन करतात आणि आपण भांडत बसतो. दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात झेंडा फडकवणारा मोदींचा माणूस होता असा पुनरुच्चार कोळसे पाटील यांनी केला. आपण प्रश्न केले नाहीत तर घरात सडून मरू. प्रश्न विचारले तर ताकद निर्माण होईल असेही ते म्हणाले.
निवृत्त पोलीस अधिकारी एस.एम मुश्रीफ म्हणाले, एल्गार म्हणजे युद्धाचे आव्हान. हे आव्हान कुणाला आहे याबाबत स्पष्टता हवी आहे. हे युद्ध विषमतावादी ब्राह्मण व्यवस्थेविरुद्धचे आहे. ब्राह्मणी व्यवस्थेने आम्हाला कधी गांभीर्याने घेतले नाही. ब्राह्मणवादावर टीका केली तर गुन्हा दाखल होत असेल तर महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर देखील गुन्हा दाखल व्हायला हवा.कारण त्यांनी कायम ब्राह्मणवादाविरोधात लढा दिला.