Paris Olympics 2024: ऑलिम्पिकमधील यंदाच्या पदकांची किंमत किती? भारतीय चलनात लाखांच्या घरात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 02:56 PM2024-08-12T14:56:33+5:302024-08-12T14:57:28+5:30
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील 16 खेळांमध्ये भाग घेऊन भारतीय खेळाडूंनी पॅरिसमधील 4 खेळांमध्ये पदक जिंकले
पॅरिस : ऑलिम्पिकमध्ये विजेत्यांना देण्यात येणाऱ्या पदकांची किंमत किती असते, याची उत्सुकता सर्वांनाच असते. पॅरिसमध्ये रविवारी समारोप होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत (Paris Olympics 2024) देण्यात आलेल्या पदकांची किंमत फोर्ब्सने नुकतीच जाहीर केली आहे.
सोने, चांदी आणि लोह यांच्या किमतीनुसार पॅरिस ऑलिम्पिकमधील सुवर्ण पदकाची (Gold Medal) किंमत सुमारे ९५० डाॅलर म्हणजेच ७९ हजार ७५० रुपये आहे. रौप्य पदक (Silver Medal) ५०७ ग्रॅम चांदी आणि १८ ग्रॅम लोह वापरून तयार केले आहे. त्याची किंमत सुमारे ४८६ डाॅलर म्हणजेच ४० हजार ८०० रुपये आहे. यासंदर्भातील वृत्तानुसार कांस्य पदकाची (Bronze Medal) किंमत सुमारे १३ डाॅलर म्हणजेच एक हजार ९० रुपये एवढी आहे.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील 16 खेळांमध्ये भाग घेऊन भारतीय खेळाडूंनी पॅरिसमधील 4 खेळांमध्ये पदक जिंकले. नेमबाजीपासून सुरुवात करून, मनू भाकरने देशाचे पहिले पदक, 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक जिंकले. त्यानंतर तिने 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत सरबज्योत सिंगसोबत जोडी केली आणि आणखी एक कांस्यपदक मिळवले. स्वप्नील कुसळेने पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये आणखी एक कांस्यपदक पटकावले.
भारतीय हॉकी संघाने पॅरिसमध्ये टोकियो 2020 च्या कांस्यपदक मिळवले आहे. स्पेनचा 2-1 असा पराभव करून हे पदक जिंकले. पुरुषांच्या भालाफेकच्या अंतिम फेरीत भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने यंदा रौप्यपदक मिळवले आहे. तथापि, पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 92.97 मीटरच्या ऑलिम्पिक विक्रमी थ्रोने सुवर्ण पदकावर मोहोर उमटवली. तर नीरजने ८९.४३ मीटर थ्रोसह रौप्यपदक जिंकले. तर अमन सेहरावतने कुस्तीपटूने पुरुषांच्या 57 किलो फ्रीस्टाइल ससामन्यात भारताला कांस्यपदक मिळवून दिले