तब्बल १११ कोटींचा केला पुणेकरांना दंड! पण वाहतूक किती सुधारली?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 04:37 PM2020-01-18T16:37:20+5:302020-01-18T16:47:24+5:30
वाहतूक शाखेकडे नव्या नजरेने पाहण्याची आवश्यकता
विवेक भुसे-
पुणे शहर वाहतूक पोलिसांनी २०१९ मध्ये वाहतूक नियमभंग केलेल्यांवर २७ लाख केसेस करुन त्यांच्याकडून तब्बल १११ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. २०१८ मधील दंडाच्या दुप्पट ही रक्कम आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर कारवाई केल्यानंतरही शहरातील वाहतूकीत सुधारणा किती झाली. लोकांनी वाहतूक नियम पाळण्याच्या प्रमाणात किती वाढ झाली याची काहीही माहिती अथवा रेकॉर्ड उपलब्ध नाही.
वाहतूकीचा प्रश्न, समस्या याविषयी कोणी बोलण्यास सुरुवात केली की, वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी इतक्या विशेष मोहिमा राबविल्या़ इतक्या वाहनांवर दंड केला़, याची आकडेवारी समोरच्याच्या तोंडावर फेकत असतात. एका बाजूला पोलीस वाहतूक सुधारणेसाठी प्रयत्न करत असतात. त्यांच्याही मर्यादा आहेत. मात्र, दंड करणे हा इतकाच एकमेव पर्याय वाहतूक शाखेकडे आहे का? जास्तीत जास्त दंड केला म्हणजे आपण काम केले असे होते का? वाहनचालकांचे प्रबोधना कार्यक्रम राबविला जातो व त्यालाही काही मर्यादा आहेत. दंड करण्याचा व त्यासाठी विशेष मोहिमा राबविणे हाच एकमेव पर्याय वाहतूक शाखेकडे आहे का? या सर्वांचा एक महानगर होत असताना आता नव्याने विचार करण्याची गरज आहे.
येत्या २ वर्षात शहरातून मेट्रो धावण्यास सुरुवात होणार आहे. त्यानंतर वाहतूक शाखेपुढील आव्हाने आणखी वाढणार आहेत.सध्या असलेल्या काही रस्त्यांवरही वाहतूक कमी होण्याची तर काही रस्त्यांवरील वाहतूकीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे.त्याचा सर्वागीण विचार व त्यादृष्टीने आखणी करुन आवश्यक ती कामे करण्यास महापालिकेच्या बरोबर वाहतूक शाखेने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.त्यामुळे केवळ दंड हा एकमेव पर्यायाशिवाय आणखी काय उपाययोजना करता येतील, याचा विचार आतापासूनच वाहतूक शाखेने करण्याची आवश्यकता आहे.
शहर पोलीस दलात दर आठवड्याला टीएमआर (बैठक) होत असते. या बैठकीत शहरात आठवड्याभरात झालेल्या गुन्ह्यांची तसेच तपास झालेल्या न झालेल्या गुन्ह्यांबद्दल चर्चा होते. मात्र, या बैठकीत शहरातील वाहतूकीवर किती चर्चा होते, याची माहिती आजवर मिळालेली नाही. वाहतूक नियमांचा भंग केलेल्या वाहनांवर किती कारवाई केली, याची माहिती वाहतूक शाखेकडून वेळोवळी दिली जाते.
या आठवड्यात शहरातील या २५ रस्त्यांवर सरासरी सुमारे ५० मिनिटे वाहतूक कोंडी झाली होती. त्यामागे ही प्रामुख्याने कारणे आहेत. या उत्सव, मोर्चा आदी कारणामुळे वाहतूक वळविण्यात आली. त्यामुळे इतका वेळ या मार्गावर वाहतूक कोंडी होती.अशी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोणते निर्णय घेणे आवश्यक आहे. मागील आठवड्यात इतक्या रस्त्यांवर इतकी मिनिटे वाहतूक कोंडी होती.त्यात या आठवड्यात ही सुधारणा करण्यात यश आले.
महापालिका व संबंधित घटकांना वाहतूक शाखेने या ठिकाणी सुधारणा करण्यास सांगितले आहे. त्यापैकी या गोष्टी हाती घेतल्या आहेत. त्यामुळे पुढील काळात येथे वाहनचालक, पादचाºयांना अधिक सुरक्षितपणे प्रवास करता येणार आहे.
अशा प्रकारच्या सविस्तर माहितीच्या आधारे चर्चा होण्याची आवश्यकता आहे. तसेच ही विस्तृत माहिती सर्व नागरिकांना उपलब्ध करुन दिली पाहिजे. त्यामुळे नागरिकांनाही आपल्यासाठी या सर्व यंत्रणा काम करीत आहेत. आपणही त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे, अशी भावना निर्माण होण्यास मदत होणार आहे. आज वाहतूक पोलीस म्हणजे रस्त्याच्या कडे उभे राहून दंड करणारी यंत्रणा इतकीच भावना नागरिकांमध्ये झाली आहे़ ती जर बदलायची असेल व चौकात उभ्या राहणाºया वाहतूक पोलिसांना सन्मान मिळावा, यासाठी नागरिकांनाही त्याच्या कामाची जास्तीतजास्त माहिती दिली पाहिजे.
आपल्याकडे अत्याधुनिक साधने हाती आहेत. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा ट्रक ठेवणे आता अधिक सोपे झाले आहे. त्याची चिकित्साही वेळच्यावेळी होण्याची आवश्यकता आहे. जर नागरिकांना अमुक एका रस्त्यावर या ठराविक वेळेत नेहमीच वाहतूक कोंडी होते, याची माहिती उपलब्ध झाली तर नागरिक पर्यायाचा विचार करु शकतील़ त्या रस्त्यावरुन त्या ठराविक वेळेच्या अगोदर अथवा नंतर जाण्याच्या पर्यायाचा विचार करु शकतील. ज्यांना जायचेच आहे, त्यांची या वाहतूक कोंडीला तोंड देण्याची मानसिक तयारी होऊ शकेल.
नाहीतर दररोज पुण्यात शेकडोने नवीन वाहनांची भर पडत राहणार आणि सध्या असलेल्या पारंपारिक दंडात्मक कारवाई होत राहील. मात्र, वाहतूक समस्या आज तेथेच राहील. किंबहुना ती आणखी जटील बनत जाईल़ त्याचा विचार करता वाहतूक शाखेने अन्य गुन्ह्यांप्रमाणेच वाहतूक कोंडी, समस्या व त्या सोडविण्यासाठी करावयाचे प्रयत्न याचा नव्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.