Pune | कोणत्या भागात किती ऊन अन् पाऊस, पुणेकरांना कळणार लाइव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 09:33 AM2023-03-31T09:33:29+5:302023-03-31T09:35:01+5:30
पुणेकरांना कळणार लाइव्ह तापमान...
- श्रीकिशन काळे
पुणे :पुणेकरांना लवकरच शहरातील किमान व कमाल तापमान लाइव्ह समजणार असून, कोणत्या परिसरात किती पाऊस झाला, त्याचीही माहिती मिळणार आहे. त्यासाठी पुणे हवामान विभाग आणि महापालिका यांच्यावतीने ३५ ठिकाणी फलक लावण्यात येणार आहेत. त्यासाठी येत्या आठवड्यात बैठक होणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. कृष्णानंद होसळीकर यांनी ‘लोकमत’ला दिली.
सध्या उन्हाळा सुरू झाला असून, घराबाहेर पडल्यानंतर किती तापमान आहे, याची माहिती नागरिकांना समजत नाही. महापालिकेच्या वतीने काही ठरावीक ठिकाणी काही फलक उभारले आहेत; परंतु त्याची माहिती केवळ ऑनलाइनच समजते. प्रत्यक्ष नागरिकांना समोर रस्त्यावरून येताना-जाताना दिसत नाही; पण आता शहरातील ३५ ठिकाणी किमान व कमाल तापमान आणि पाऊस पडल्यानंतर किती मिमी पाऊस झाला, त्याची माहिती लगेच फलकावर झळकणार आहे.
यासाठी हवामान विभागाचे डॉ. होसळीकर यांनी काही दिवसांपूर्वी महापालिकेला पत्र पाठविली होते. त्यानंतर त्यांना महापालिकेच्या आयटी विभागाकडून प्रतिसाद मिळाला. त्यांनी या उपक्रमासाठी सकारात्मक असल्याचे कळविले. तसेच शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत अनेक कामे केली जाणार आहेत. त्याअंतर्गत तापमान आणि पाऊस किती आहे, याचाही समावेश करणार आहेत. याबाबत डॉ. होसळीकर म्हणाले, ‘उन्हाचा पारा किती झाला आहे किंवा पावसाळ्यात अनेक भागात खूप पाऊस पडतो. तो किती झाला, याची माहिती नागरिकांना लगेच समजत नाही. त्याविषयी मी विचार करून शहरात लाइव्ह डाटा देता येऊ शकतो. त्यामुळे त्याचा नागरिकांना फायदाच होईल. म्हणून महापालिकेला पत्र पाठविले होते. त्यांच्याकडून प्रतिसाद आला आहे. पुढील आठवड्यात आमची बैठक होणार आहे. त्यामध्ये शहरातील कोणकोणत्या भागात आणि कुठे फलक लावायचे ते ठरविण्यात येईल.’
सामान्य नागरिकांना हवामानाची माहिती मिळावी, म्हणून मी नेहमी प्रयत्नशील असतो. पुणेकरांनाही आता रस्त्यावरून ये-जा करताना फलकांवर लाइव्ह तापमान समजू शकेल. आमच्याकडे तापमान व पावसाचा डाटा असतो. त्याचा उपयोग नागरिकांना व्हायला हवा.
- डॉ. कृष्णानंद होसळीकर, अतिरिक्त महासंचालक, भारतीय हवामानशास्त्र विभाग
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून लाइव्ह तापमान देण्याचा उपक्रम स्मार्ट सिटीअंतर्गत होत आहे. आता पुणे व पिंपरी चिंचवडमधील काही भागातील तापमान ऑनलाइन पाहायला मिळते आहे.
- मंगेश दिघे, पर्यावरण अधिकारी, महापालिका