डेटापॅकमध्ये किती ही महागाई? दुधाइतका खर्च मोबाइल रिचार्जवर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 09:04 AM2023-01-30T09:04:46+5:302023-01-30T09:05:02+5:30
मोबाईलचे नेट रिचार्ज करण्यासाठी आता विविध कंपन्यांचे दर वेगवेगळे आहेत...
पुणे : महागाईच्या या काळात एका कुटुंबाचा मोबाईल रिचार्जचा खर्चदेखील चांगलाच वाढला आहे. प्रत्येकाच्या हाती मोबाईल असून, नेट रिचार्जही महिन्याला करावे लागत आहे. त्यामुळे मध्यम वर्गातील कुटुंबीयांच्या घरातील डेटाचा खर्च महिनाभराच्या खर्चापेक्षाही अधिक होत आहे.
एका रिचार्जचा महिन्याचा खर्च २९९
- मोबाईलचे नेट रिचार्ज करण्यासाठी आता विविध कंपन्यांचे दर वेगवेगळे आहेत. त्यामध्ये पूर्वी महिन्याला १९९ रुपये नेट रिचार्ज होते. आता ते २९९ आणि त्याहून अधिक केले आहेत. सर्वच कंपन्यांनी नेट रिचार्जचे दर चांगलेच वाढविले आहेत.
एका घरात किमान तीन मोबाईल :
पूर्वीसारखे एकत्र कुटुंब पद्धत राहिली नाही, त्यामुळे शहरातील प्रत्येकी कुटुंबात नवरा-बायको आणि एक मुलगा, मुलगी असे तिघांचे किंवा चौघांचे कुटुंब आहे. प्रत्येकाकडे मोबाईल आहे. प्रत्येकाचे महिन्याचे रिचार्ज २९९ म्हटले तरी महिन्याला ११९६ रुपये बिल होते. काही जणांना दररोज एक जीबी डाटा मिळतो, तो पुरत नाही. मग ते एक्स्ट्रा रिचार्ज करतात.
ग्रामीण भागातही वाढले रिचार्ज सेंटर :
- शहरातच नव्हे, तर गावा-गावांत मोबाईलची संख्या वाढली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात रिचार्ज सेंटरची संख्याही वाढली आहे. शंभर घरांचे गाव असेल तर तिथे जवळपास चारशे-पाचशे मोबाईल असतात. त्यांचे रिचार्ज करण्यासाठी ठिकठिकाणी सेंटर होत आहेत.
दूध अन् मोबाईल रिचार्जचा खर्च सारखाच
घरांमध्ये दररोज एक लिटर दूध घेतले जाते. लिटरचा खर्च दरराेज साधारण ५० रुपयांच्या आसपास आहे. त्यानुसार महिन्याला १५०० रुपये खर्च येतो. ज्यांच्या घरात पाच-सहा जण राहतात. त्यांचा मोबाईल रिचार्जचा खर्च दुधापेक्षा अधिक होतो.
घरात आम्ही चौघेजण आहोत. प्रत्येकाकडे मोबाईल असून, महिन्याला जवळपास दीड हजार खर्च येतो. दुधाचाही खर्च जवळपास तेवढाच येतो. दोन्ही गोष्टी अत्यावश्यक झाल्या आहेत.
- वैशाली टिळेकर, आयटी कर्मचारी