किती असावी मुलांची झोप?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:11 AM2021-09-24T04:11:48+5:302021-09-24T04:11:48+5:30
नवजात शिशू : नवजात शिशूपासून ते तीन महिन्यांच्या शिशूंची झोप ही इतर सर्व वयोगटापेक्षा अधिक असते. या वयोगटातील ...
नवजात शिशू : नवजात शिशूपासून ते तीन महिन्यांच्या शिशूंची झोप ही इतर सर्व वयोगटापेक्षा अधिक असते. या वयोगटातील मुले सुमारे १४ ते १७ तास झोपतात. त्यामुळे या वयोगटतील मुले कमीत-कमी ११ ते १३ तास झोपावेत याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, मात्र १९ पेक्षा अधिक तास ते झोपत असतील तर त्यांच्या बुद्धीच्या विकासावर परिणाम होऊ शकतो हेही लक्षात घ्यावे.
शिशू : चार महिन्यांपासून ते एक वर्षे वयापर्यंतच्या मुलांमध्ये १२ ते १५ तास झोप ही सामान्य मानली जाते. तरी देखील या वयोगटातील मुले किमान १० तास झोपावी याकडेही पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र ती मुले १८ तासांपेक्षा अधिक झोपत असतील तर मात्र त्यांच्या आरोग्याला ही झोप अपायकारक ठरते. एक ते दोन वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये ही झोप ११ ते १४ वर्षे सामान्य मानली जाते तर तीन ते पाच वर्षांच्या मुलांमध्ये १० ते १३ तासांची झोप आवश्यक असते. मात्र मोठ्याप्रमाणे आठ तासांपेक्षा कमी झोप होत असेल तर शिशूंच्या प्रकृतीवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.
शाळकरी मुले : सहा ते तेरा वर्षांच्या मुलांमध्ये ९ ते ११ तासांची झोप ही साधारण मानली जाते. मात्र सात तासांपेक्षा कमी झोप आणि ११ तासांपेक्षा अधिक झोप मुले सातत्याने झोपत असतील तर त्यांना या झोपण्याचे तोटे सहन करावे लागतात. तर १४ ते १७ वर्षांच्या मुलांमध्ये मात्र आठ ते दहा तासांची झोप असणे हे त्यांच्या मानसिक व शारीरिक विकासासाठी आवश्यक असते. त्यामुळे मुले पहाटे लवकर उठत असतील तर त्यांना रात्री लवकर झोपवणे महत्त्वाचे आहे. खंडित झोपेपेक्षा शिवाय सलग झोप ही शरीराला अधिक फायदेशीर ठरते.
तरुण व प्रौढ अवस्था : अठरा ते ६५ वर्षापर्यंतच्या वयामध्ये साधारण सात ते नऊ तास झोप असणे स्वाभाविक आहे. १८ ते २५ या वयात शरीराची क्रियाशक्ती अधिक असते, त्यामुळे या वयात नऊ तासांपेक्षा अधिक वेळ झोपणे म्हणजे केवळ शारीरिक हानीच नाही तर आयुष्यातील मौल्यवान वेळ वाया घालविणे मानले जाते. त्यामुळे या वयात अधिकाधिक ताजेतवाने राहण्यासाठी उत्तम व्यायाम आणि सात ते नऊ तासांची झोप महत्त्वाची आहे.
वृद्धावस्था : ६५ वर्षापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींमध्ये निद्रानाश हा प्रकार अधिक आढळतो. तरी देखील या वयात ७ ते ८ तासांची झोप आवश्यक असते. कितीही निद्रानाश असला तरी कमीकमी पाच तासांची सलग झोप होत नसेल तर शरीरात विविध व्याधी निर्माण होऊ शकतात तसेच नऊ तासांपेक्षा अधिक झोप सातत्याने येत असेल तरी शरीराची रचना बिघडू शकते.
झोपेचा सरळ संबंध हा रक्तदाब, मस्तिष्क, कार्यक्षमता, ऊर्जा, मानसिकता, डोकेदुखी, मधुमेह, स्थूलपणा आणि हृदयरोगाशी असतो. त्यामुळे विविध वयोगटात शरीराला पोषक अशी झोप अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे पालकांनी स्वत:ही आवश्यक तितकी झोप घ्यावीच आणि मुलांच्या झोपेवरही लक्ष ठेवणे आवश्यक ठरते.