अबब! केवढी ही पत्रिका, प्रसिद्ध गायिका अमृता फडणवीसांच्या हस्ते प्रमाणपत्र
By राजू इनामदार | Published: January 24, 2024 07:09 PM2024-01-24T19:09:14+5:302024-01-24T19:10:03+5:30
बाणेर येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाने तब्बल ५० फूट उंच आणि ४० फूट रुंदीची पत्रिका तयार केली...
पुणे : एखाद्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका किती मोठी असू शकते? फार तर फुलस्केप. त्यापेक्षा आणखी थोडी मोठी; मात्र बाणेर येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाने तब्बल ५० फूट उंच आणि ४० फूट रुंदीची पत्रिका तयार केली. निमित्त होते, अयोध्येतील राममंदिर व राममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे. त्यांच्या या विक्रमाची नोंद घेतल्याचे प्रमाणपत्र प्रसिद्ध गायिका अमृता फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आले.
बाणेर येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आहे. या विद्यालयाचे सदस्य असलेले डॉ. दीपक हरके वेगवेगळ्या कल्पनांसाठी प्रसिद्ध आहेत. तब्बल १८३ विश्वविक्रम त्यांच्या नावावर जमा आहेत. त्यांनी अशा विक्रमी निमंत्रण पत्रिकेची कल्पना मांडली आणि ती प्रत्यक्षातही आणली. इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्डमध्येही याची नोंद झाली आहे.
जगभर पाहिल्या गेलेल्या या सोहळ्याचे देशाच्या दृष्टीने अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्याची पत्रिकाही अशीच हवी होती, असे फडणवीस म्हणाल्या. डॉ. हरके, डॉ. त्रिवेणी, सुवर्णा दीदी यांनी प्रमाणपत्र स्वीकारले. डॉ. त्रिवेणी यांनी सांगितले की, श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना अयोध्येत झाली असली तरी, त्याची सकारात्मक ऊर्जा अवघ्या जगभर पसरली आहे.