Pune: पुणेकरांना किती पाणी मिळणार? कालवा समितीला करावी लागणार कसरत

By नितीन चौधरी | Published: September 1, 2023 05:41 PM2023-09-01T17:41:09+5:302023-09-01T17:41:27+5:30

पुणेकरांसह ग्रामीण भागाचे लक्ष लागून आहे...

How much water will the people of Pune get? The canal committee will have to exercise | Pune: पुणेकरांना किती पाणी मिळणार? कालवा समितीला करावी लागणार कसरत

Pune: पुणेकरांना किती पाणी मिळणार? कालवा समितीला करावी लागणार कसरत

googlenewsNext

पुणे : पावसाने दडी मारल्याने शहराला पिण्यासाठी तर ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे अद्याप केवळ ९४ टक्केच भरली आहेत. मॉन्सूनने दडी मारल्याने धरणे केव्हा भरतील याची शाश्वती नाही. त्यामुळे पुणेकरांना पाणी पुरवून रब्बी व उन्हाळी हंगामासाठी ग्रामीण भागाला किती पाणी देण्यात येईल, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. २) होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत शहराच्या पाणीकपातीचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. याकडे पुणेकरांसह ग्रामीण भागाचे लक्ष लागून आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार की नाही, याची उत्सुकता असली तरी सहकारमंत्री व आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील उपस्थित राहणार आहेत. पालकमंत्री पाटील आणि पवार यांच्यात सुरू असलेल्या शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या २७.५५ टीएमसी (९४.५० टक्के) पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी हाच साठा २९.१० टीएमसी होता. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार दुसऱ्या आठवड्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, पुरेसा पाऊस न आल्यास शेतीसाठीच्या पुरवठ्याबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे ग्रामीण भागाचे लक्ष लागले आहे.

पाणीसाठ्यात वाढ न झाल्यास शहराचे पाणीकपात करून काही पाणी ग्रामीण बागाला आवर्तनातून देण्यात येईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुण्याला वर्षभरात १८.५ टीएमसी पाण्याची गरज भासते. आगामी काळात पुरेसा पाऊस न पडल्यास उपलब्ध साठ्यावर पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची गरज भागवावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर पाण्याचे नियोजन करावे लागणार असून, पाणी जपून वापरण्याची सूचना जलसंपदा विभागाने महापालिकेला केली आहे.

पुणे विभागात पाऊस झाल्यावर अतिरिक्त सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात पाणी जमा होते. यंदा मात्र, पुरेशा पावसाअभावी पाणी सोडण्यात आलेले नाही. अगदी थोड्या प्रमाणात सोडलेल्या पावसामुळे तसेच उजनीत जमा होणाऱ्या अन्य मार्गामुळे सध्या धरणात केवळ १३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात धरणात पाणी जमा न झाल्यास सोलापूर, पंढरपूर सारख्या शहरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करायची की शेतीला पाणी द्यायचे यावरून वाद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, पावसाचा आणखी एक महिना शिल्लक आहे. या काळात एक आठवडा सलग पाऊस झाल्यास पुणे विभागातील पूर्ण क्षमतेने भरलेल्या धरणांतून सोडलेल्या पाण्यावर धरण भरू शकते असा विश्वास जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांनी बोलून दाखविला आहे.

धरणांतील पाणीसाठा

धरण- टीएमसी- टक्के

खडकवासला १.११--५६.२२
पानशेत १०.६५--१००

वरसगाव १२.८२--१००
टेमघर २.८७--८०.०३

एकूण २७.५५--९४.५०
गेल्या वर्षीचा साठा

२९.१० टीएमसी ९९.८३ टक्के

Web Title: How much water will the people of Pune get? The canal committee will have to exercise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.