५० लाख पुणेकरांचे प्रश्न सुटणार कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 03:28 AM2018-06-28T03:28:54+5:302018-06-28T03:28:59+5:30
सत्ताधारी भाजपाकडून सध्या महिन्याला केवळ एकच दिवस सर्वसाधारण सभा घेतली जाते. त्या एका दिवसात चार ते पाच तासाच सभेचे कामकाज होते.
पुणे : सत्ताधारी भाजपाकडून सध्या महिन्याला केवळ एकच दिवस सर्वसाधारण सभा घेतली जाते. त्या एका दिवसात चार ते पाच तासाच सभेचे कामकाज होते. याशिवाय अनेक कारणांमुळे सभा तहकुब केल्या जातात. यामुळे संपूर्ण पुणे शहराचे व तब्बल ५० लाख पुणेकारांचे हजारो प्रश्न एका दिवसात कसे सुटणार, असा सवाल राष्ट्रवादीचे नगरसेवक भय्यासाहेब जाधव व योगेस ससाणे यांनी केला आहे. सर्वसाधारण सभा होत नसल्यामुळेच प्रशासनावर अंकुश राहिला नाही. त्यामुळे प्रत्येक महिन्यात किमान पाच दिवस सर्वसाधारण सभा घ्यावी, अशी मागणी त्यांनी महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे केली.
गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज हे महिन्यातून केवळ दोन दिवस चालविण्याचा नवीन पायंडा सुरू केला आहे. त्या दोन दिवसांपैकी एक सभा ही मासिक सभा असते व ती समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या निधनामुळे कोणतेही कामकाज न चालविता तहकुब केली जाते.
वास्तविक पाहता पुणे महापालिकेचे सभासद हे नवीन हद्दीतील जोडलेल्या गावांतील असून सभा कामकाजासाठी येत असतात.
जवळपास १५ ते २० किमी अंतरावरून सभासद त्यांच्या भागातील समस्या मांडण्यासाठी सर्वसाधारण सभा हे एकमेव साधन आहे; परंतु महिन्यातून फक्त एकच दिवस सभा चालत असेल तर त्या एका दिवसातील चार ते पाच तासांत ५० लाख लोकसंख्या असलेल्या पुणेकरांचे प्रश्न कसे सुटतील. सभा पूर्णपणे होत नसल्याने प्रशासनावरील आपला अंकुश सुटत चालला
आहे.
काळानुरूप बदल घडवून महिन्याच्या पहिल्या दिवशी असलेल्या सर्वसाधारण सभेत श्रद्धांजली वाहून १० मिनिटे सभा तहकूब करून त्याच दिवशी १० मिनिटांनंतर सभेचे कामकाज पूर्ण करावे.
दरमहा कमीत कमी ५ दिवस मुख्य सभा चालवावी, अशी मागणी महापौरांना दिलेल्या पत्रात ससाणे आणि जाधव यांनी केली आहे.