कसा सापडला डुग्गु?... अपहरणकर्त्याने पिशवीत ठेवला होता घरच्यांचा फोन नंबर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 04:59 PM2022-01-19T16:59:19+5:302022-01-19T17:12:18+5:30
डुग्गु घरी कसा परतला, जाणून घ्या सविस्तर...
पुणे: मागील काही दिवसांपासून पुण्यासह महाराष्ट्रात डुग्गुच्या अपहरणाची मोठी चर्चा होती. बाणेर परिसरातून ४ वर्षीय स्वर्णव चव्हाण (swarnav chavan) या चिमरड्याचे अपहरण झाले होते. जर हे प्रकरण जर मीडियातून व्हायरल झालं तर मुलाच्या जीवाला धोका होण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनीही याबद्द्ल मोठी गुप्तता पाळली होती. तब्बल आठवड्यानंतर पोलिसांना स्वर्णवला शोधण्यात यश आले आहे.
डुग्गुचा शोध कसा लागला-
डुग्गु हा पोलिसांना पुणावळे परिसरात मिळून आला. या चिमुरड्याला अपहरणकर्त्यानेच त्याठिकाणी सोडून पसार झाल्याचे समोर आले आहे. पुणावळे परिसरात एका कामगाराजवळ अपहरण करणाऱ्याने सोडले. मी दहाच मिनिटांत माघारी येतो, असे म्हणून निघून गेला. त्यानंतर डुग्गुच्या पालकांना याबद्दलची माहिती देण्यात आली. पण, तो व्यक्ती बराच वेळ आला नाही. तर, तिकडे मुलगाही देखील रडू लागल्याने त्या कामगाराने त्याची पिशवी पाहिली. त्यात एक मोबाईल क्रमांक मिळाला. त्याने त्या नंबरवर संपर्क साधला. त्यावेळी पालकांनी ही माहिती पोलीसांना दिली. लगेच सगळी सुत्रे फिरल्यामुळे या चिमुरड्याला वाचवण्यात यश आले आहे. ज्या व्यक्तीने अपहरण केले होते त्या व्यक्तीला पकडण्यात पोलिसांना अजून यश आले नाही.
स्वर्नव सतिश चव्हाण (वय ४ वर्षे) असे अपहरण झालेल्या या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. गेल्या आठवड्यात (दि. ११ जानेवारी) स्वर्णवचे अपहरण झाले होते. शाळेत जाताना चार वर्षीय डुग्गुचे दुचाकीवरून अपहरण करण्यात आले होते. काही वेळाने हा प्रकार उजेडात आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.
दिवसभर पोलीसांनी शोध घेतल्यानंतर त्याचा काहीच थांगपत्ता लागला नव्हता. दरम्यान, त्यानंतर एक-एकदिवस शोध मोहिमेचा सुरू झाला आणि सर्वांचेच धाबे दणाणले. या मुलाला एका दुचाकीवरून नेण्यात आले होते. त्याचे सीसीटीव्ही फुटेजही मिळाले होते. परंतु, त्याचा थांगपत्ता लागत नव्हता. तब्बल आठ दिवसांपासून निम्मे पोलीस दल त्याचा शोध घेत असताना देखील कोणताही क्लू पोलीसांना मिळत नव्हता. पोलीस दलात प्रेशर वाढले असताना सोशल मिडीयावर त्याची मोठी चर्चा सुरू झाली होती.