निवडणूक कशी घेणार?
By admin | Published: December 31, 2016 05:35 AM2016-12-31T05:35:42+5:302016-12-31T05:35:42+5:30
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले कर्मचारी मिळवण्यात पालिकेच्या निवडणूक शाखेसमोर अनेक अडचणी येत आहेत. त्याची दखल घेत निवडणूक
पुणे : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले कर्मचारी मिळवण्यात पालिकेच्या निवडणूक शाखेसमोर अनेक अडचणी येत आहेत. त्याची दखल घेत निवडणूक आयोगाने कर्मचाऱ्यांची माहिती न देणाऱ्या कार्यालयप्रमुखांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मनपा निवडणूक शाखेला दिले आहेत.
निवडणूक प्रक्रियेसाठी पालिकेला वर्ग १ पासून ते वर्ग ४ पर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांवर किमान २५ ते ३० हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची गरज लागते. निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र कर्मचारीवर्ग नाही. त्यामुळे हे अधिकारी व कर्मचारी, सरकारी, निमसरकारी तसेच खासगी शिक्षण सस्थांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांमधून नियुक्त केले
जातात. त्यासाठी त्यांना मानधनही अदा केले जाते.
मात्र, मतदान केंद्रातील कामकाज, त्यासाठी दूरवर जावे लागणे, गैरसोयी सहन कराव्या लागणे, द्यावा लागणारा वेळ, त्या तुलनेत उशिरा व कमीच मिळणारे मानधन यामुळे अनेकांचा, त्यातही खासगी संस्थांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कल हे काम टाळण्याकडेच जास्त असतो. त्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा वापर केला जातो. मात्र आता संस्थांप्रमुखांकडूनच त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे स्पष्ट होत आहे.
पालिका निवडणूक प्रक्रियेचे निवडणूकप्रमुख म्हणून महापालिका आयुक्तांच्या स्वाक्षरीने सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालये, खासगी संस्था यांना त्यांच्याकडील अधिकारी, कर्मचाऱ्यांची माहिती पालिकेकडे पाठविण्यासंबंधी पत्र दिले आहे. मात्र यातील अनेक संस्थांनी या पत्राची दखलच घेतलेली नाही.