आकाशगंगा कशी तयार होते, ते कळणार! भारतीय खगोलशास्त्रज्ञांना दुर्मिळ रेडिओ उत्सर्जनाचा शोध
By श्रीकिशन काळे | Published: May 6, 2024 04:54 PM2024-05-06T16:54:10+5:302024-05-06T16:55:46+5:30
२० लाख प्रकाश-वर्षे अंतरात पसरलेला हा रेडिओ स्रोत दीर्घिका किंवा आकाशगंगा समूह (गॅलेक्सी क्लस्टर) एबेल २१०८ (A2108) मध्ये स्थित आहे....
पुणे : ‘जीएमआरटी’च्या महाकाय रेडिओ दुर्बिणीने दुर्मिळ अशा ‘रेडिओ उत्सर्जना’चा शोध लावला आहे. या शोधातून आकाशगंगा समूहांची निर्मिती आणि उत्क्रांतीबद्दल महत्त्वपूर्ण घटनाक्रम कळण्यास मदत होणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इंदूरच्या स्वर्णा चॅटर्जी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय खगोलशास्त्रज्ञांच्या चमूने महाकाय रेडिओ दुर्बिणीच्या (अपग्रेडेड जीएमआरटी) वापरातून उत्तर दुर्मिळ रेडिओ उत्सर्जनाचा स्रोत शोधला आहे. २० लाख प्रकाश-वर्षे अंतरात पसरलेला हा रेडिओ स्रोत दीर्घिका किंवा आकाशगंगा समूह (गॅलेक्सी क्लस्टर) एबेल २१०८ (A2108) मध्ये स्थित आहे.
आकाशगंगा समूह ही विश्वात आकाराला आलेली सर्वात मोठी गुरुत्त्वाकर्षणाने बांधलेली रचना मानली जाते. आकाशगंगा समूहाचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या हजार ट्रिलियन पट जास्त असते. या समूहांमधील विद्युत भारित कण दोन समूहांच्या धडकीमध्ये ऊर्जावान होतात. या उत्सर्जनांमधील रेडिओ अवशेष बहुतेक वेळा आकाशगंगा समूहाच्या बाहेर आढळतात. असे रेडिओ अवशेष हे आकाशगंगा समूहातील धडकांमुळे झालेल्या शक्तिशाली धक्का तरंगांचे (शॉक वेव्ह) पुरावे आहेत. हे तरंग जीएमआरटीच्या दुर्बिणीने शोधले आहेत.
‘एबेल २१०८’ हा कमी वस्तुमान असलेला आकाशगंगा समूह आहे, ज्यामध्ये दक्षिणेकडील भागात रेडिओ उत्सर्जन आधी आढळले होते. चटर्जी आणि टीमने केलेल्या नवीन निरीक्षणाने आकाशगंगा समूहाच्या उत्तरेला आणखी एक अस्पष्ट रेडिओ उत्सर्जनाची रचना शोधली आहे, ज्याला ‘एन इ’ असे नाव दिले आहे. ही रेडिओ रचना शोधल्यामुळे हा समूह दुर्मिळ दुहेरी रेडिओ अवशेष असलेला म्हणून ओळखला जाईल. नव्याने सापडलेली रचना दक्षिणेकडील (एस-डब्ल्यू) अवशेषाच्या दुप्पट मोठी आहे. तसेच आतापर्यंत सापडलेल्या सर्वात कमी शक्ती असलेल्या रेडिओ अवशेषांपैकी एक आहे.
या संशोधनाचे नेतृत्व स्वर्ण चॅटर्जी (पीएचडी विद्यार्थिनी) यांनी अभिरूप दत्ता (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंदूर) यांच्यासोबत केले आहे. तसेच माजिदुल रहमान (नॅशनल त्सिंग हुआ युनिव्हर्सिटी-तैवान), रुता काळे, (नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स,पुणे, आणि सुरजित पॉल (मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशन), सुरजित हे GLOMACS प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक आहेत.
एबेल २१०८ सारख्या कमी वस्तुमान असलेल्या आकाशगंगा समूहाचा अभ्यास महत्त्वाचा आहे. कारण विश्वातील सुरुवातीच्या आकाशगंगा समूहाची निर्मिती आणि चुंबकीय क्षेत्रे आणि आकाशगंगा समूहातील माध्यम यांच्यातील परस्परसंवाद समजून घेता येईल.