'मी गावाकडे फोन केल्यावर...', कुसळं उगवणाऱ्या डोंगरावर 'अशा' पद्धतीने उभ्या राहिल्या पवनचक्क्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 07:52 PM2022-02-19T19:52:11+5:302022-02-19T20:01:57+5:30
डोंगरावर फेरफटका मारताना जाणवलेल्या अनुभवाने राज्यातील पवनचक्की निर्मिती...
बारामती: ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांनी खामगळवाडी(ता.बारामती) येथे आयोजित सेंद्रीय शेती मेळाव्यात बोलताना कुसळ उगवणाऱ्या डोंगरावर उभा राहिलेल्या पवनचक्क्यांची कहाणी सांगितली. डोंगरावर फेरफटका मारताना जाणवलेल्या अनुभवाने राज्यातील पवनचक्की निर्मिती झाल्याचे यावेळी पवार यांनी सांगितले.
खामगळवाडी(ता.बारामती) येथे शेतकऱ्यांनी उभारलेल्या जोगेश्वरी किसान समृध्दी प्रोड्युसर कंपनी ली. चे उदघाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित सेंद्रीय शेती मेळाव्यात पवार बोलत होते. तत्पुर्वी मोर्फाच्या उपाध्यक्षा स्वाती शिंगाडे यांनी या प्रकल्पाची पार्श्वभुमी सांगितली. यावेळी माजी बांधकाममंत्री विक्रमसिंह पाटणकर, बारामती अॅग्रोचे चेअरमन राजेंद्र पवार, मोर्फाचे तज्ञ संचालक युगेंद्र पवार, सचिव प्रल्हाद वरे, अरविंद शिंगाडे आदी उपस्थित होते.
यावेळी पवार म्हणाले, त्यावेळी मुख्यमंत्री असताना मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या घरी मुक्कामी होतो. दुसऱ्या दिवशी सभोवतालच्या डोंगरावर जायची इच्छा व्यक्त केली. यावर पाटणकर यांनी डोंगरावर कुसळ उगवतात असे सांगितले. तसेच अवघड चढण असल्याने तिकडे जाताना येणार नसल्याचे म्हणाले. त्यानंतर देखील आपण हेलिकॉप्टरने जाऊ असे म्हणत पायलटला बोलावले. हेलिकॉप्टर डोंगरावर सपाट जागेवर उतरवले.
डोंगरावर पोहचल्यावर वारा प्रचंड होता. त्यामुळे हेलिकॉप्टर देखील हालत होते, त्यावर याठिकाणी पवनचक्क्याची उभारता येतील, असे सांगितले. त्यावर सरकारी धोरण ठरवून पाटणमधील त्या डोंगर परिसरात पवनचक्क्या उभारण्यात आल्या. पाटण शिवाय सातारा, रत्नागिरी, सांगली, महाबळेश्वर, अहमदनगर, ठाणे अशा विविध जिल्ह्यात हजारो पवनचक्क्या उभ्या राहिल्या मी गावाकडे फोन केल्यावर पाऊसपाणी कसा आहे असे विचारतो. जेव्हा पाटणकरांना कॉल करतो तेव्हा गावाकडे वारा कसा आहे, अशी विचारणा करतो अस म्हणता एकच हशा पिकला.