MHT CET 2022: सीईटी परीक्षेतील चुका टाळायच्या कशा ?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 05:51 PM2022-04-14T17:51:00+5:302022-04-14T17:57:12+5:30

येणाऱ्या सीईटी परीक्षेची तयारी कशी करावी यावर महत्त्वपूर्ण लेख

how to avoid mistakes in cet exam education news | MHT CET 2022: सीईटी परीक्षेतील चुका टाळायच्या कशा ?

MHT CET 2022: सीईटी परीक्षेतील चुका टाळायच्या कशा ?

Next

महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सामायिक प्रवेश परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून, शेवटची तारीख १५ एप्रिल आहे. या परीक्षेसाठी भौतिकशास्त्र रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र या तीन प्रश्नपत्रिका प्रत्येकी शंभर गुणांच्या असतील. पहिल्या प्रश्नपत्रिकेत गणिताचे प्रत्येकी दोन गुणांचे ५० प्रश्न असतील, ज्यातील दहा प्रश्न अकरावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतील. दुसऱ्या प्रश्नपत्रिकेत भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र यांचे एक गुणाचे प्रत्येकी ५० प्रश्न असतील. त्यातही दोन्ही विषयांच्या ५० प्रश्नांपैकी अकरावीचे दहा प्रश्न असतील. तिसऱ्या प्रश्नपत्रिकेत जीवशास्त्रासाठी प्रत्येकी एक गुणाचे १०० प्रश्न विचारले जातील. त्यातले २० प्रश्न अकरावीवर आधारित असतील. परीक्षेसाठी तीन तासांचा वेळ असेल आणि मूल्यांकनात कुठेही नकारात्मक गुणपद्धती नसेल. हे सगळे प्रश्न बहुपर्यायी असतील.

बहुपर्यायी पर्यायातून अचूक पर्याय निवडताना विद्यार्थी गडबडून जातात. काही विद्यार्थ्यांना वेळही पुरत नाही. पूर्ण अभ्यास केलेला असताना फक्त परीक्षेच्या दबावामुळे गोंधळून जाऊन झालेल्या चुका परवडणार नाहीत. प्रवेश परीक्षेत या चुका होऊ नये म्हणून काय मानसिक तयारी करावी, योग्य पर्याय कसा निवडावा, याचा उहापोह आपण करूयात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक प्रश्न अचूकपणे दोनदा, उत्तराचे पर्याय न पाहता वाचून घ्यावा. साधारणपणे इथेच चूक होते, प्रश्न पूर्ण न वाचता विद्यार्थी पूर्वनिर्धारित समजावर पटकन पर्याय निवडतात आणि चूक करतात. प्रश्न वाचल्यानंतर अगोदर पर्याय न पाहता मनात त्या प्रश्नाचे उत्तर आठवून बघा, कारण पर्याय वाचून उत्तर आठवायचा प्रयत्न केला तर त्याचा प्रभाव पडतो आणि चूक होऊ शकते. बहुपर्यायी प्रश्नांमध्ये दिलेले पर्याय साधारणत: अगदी जवळचे असल्याने भ्रमित करतात. त्यामुळे सगळ्यात सोपा उपाय म्हणजे निर्मूलन धोरण. यात ज्या पयार्यांबद्दल अगदी शंभर टक्के खात्री आहे की ते चुकीचे आहे, असे पर्याय बाजूला काढून टाकायचे म्हणजे उरलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडण्याची शक्यता वर्धित होते.

योग्य पर्याय निवडण्यापेक्षा सर्वोत्तम पर्याय निवडला पाहिजे. बऱ्याच वेळा विद्यार्थी योग्य उत्तर माहीत असल्याचे समजून सगळे पर्यायसुद्धा न वाचता, वेळ वाचवायचा म्हणून पटकन उत्तर निवडतात आणि चूक होते. म्हणून प्रत्येक पर्याय शांतपणे वाचून सर्वोत्तम प्रत्यय निवडला पाहिजे. एखाद्या प्रश्नाबद्दल ज्ञान नसल्याचे उत्तराचा अंदाज घेताना तो कुठलातरी तर्क लावून केला पाहिजे. ज्या पर्यायांमध्ये नाही (नॉट), नेहमीच (अल्वेज), कधीकधी (समटाईम्स), कधीच नाही (नेव्हर) असे शब्दप्रयोग असतात. तिथे निर्णय घेताना विशेष काळजी घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे ज्या प्रश्नांमध्ये ‘यापैकी कोणताही नाही’ किंवा ‘सर्व पर्याय अचूक’ असा शेवटचा पर्याय असतो. तिथेही चुका होण्याची शक्यता खूप जास्त असते. सर्वोत्तम पर्याय निवडण्याची अजून एक सोपी शक्कल म्हणजे सर्वोत्तम पर्यायात जास्तीत जास्त माहिती दिलेली असते. ज्या प्रश्नाबद्दल अगदीच काहीच माहिती नाही, त्याचे उत्तर शोधताना मानसशास्त्रामध्ये एक पद्धत अस्तित्वात आहे, ज्याला संदर्भ आधारित स्मृती असे म्हणतात. त्याचा वापर करताना प्रश्नाबद्दलचे संदर्भ शोधावेत. जसे की याबद्दल कुठे ऐकले व वाचले आहे किंवा कोणी सांगितले आहे आदी. यातून आपल्या मेंदूला चालना मिळते आणि उत्तरापर्यंत पोहोचण्यास मदत होते.

संख्यात्मक प्रश्ने सोडवताना अंकात्मक पर्यायात टोकाची उत्तरे साधारणपणे अयोग्य असतात आणि म्हणून ते टाळून उरलेल्या पर्यायातून सर्वोत्तम पर्याय निवडावा. काही प्रश्नांची उत्तरे प्रश्नातच लपलेली असतात म्हणून प्रत्येक प्रश्न शांतपणे वाचला पाहिजे. साधारणपणे सुरुवातीच्या काही मिनिटांत सगळी प्रश्ने वाचून घ्यावीत, ज्या प्रश्नांच्या उत्तरांबद्दल पूर्ण खात्री आहे, अशी प्रश्ने आधी सोडवावीत, त्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि बाकीचा पेपर सोडवताना मदत होते. वेळेचे योग्य नियोजन केल्यास सगळे प्रश्न व्यवस्थितपणे हाताळली जाऊ शकतात. या सर्व गोष्टींची काळजी घेतली तर प्रवेश परीक्षेमध्ये यश अगदी सहजपणे कवेत घेता येते.

- डॉ. गणेश काकांडीकर, मॅकेनिकल इंजिनिअरिंगमधील तज्ज्ञ

Web Title: how to avoid mistakes in cet exam education news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.