रस्ता ओलांडायचा तरी कसा? नव्या सिग्नल्समध्ये पादचाऱ्यांसाठी अवघे ५ सेकंद
By राजू इनामदार | Published: October 6, 2023 03:31 PM2023-10-06T15:31:55+5:302023-10-06T15:32:18+5:30
आधी पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी अनेक ठिकाणी स्वतंत्र सिग्नल्सच नव्हते, मात्र आता त्यासाठी फक्त ५ सेकंद देण्यात आले आहेत
पुणे: बराच गाजावजा करत बसवण्यात आलेल्या रस्त्यांवरच्या नव्या ॲडॉप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम ( एटीएमएस) असलेल्या सिग्नल्समध्ये पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी अवघे ५ सेकंद देण्यात आले आहेत. इंडियन रोड काँग्रेस (आयआरसी) च्या निर्देशांनुसार किमान १५ सेकंद देणे आवश्यक असतानाही अशी रचना करण्यात आली आहे. स्वयंसेवी संस्थांनी त्यावर विचारणा केली असता महापालिका व वाहतूक शाखा यांच्याकडून टाळाटाळ केली जात आहे.
शहरातील गर्दीच्या अनेक रस्त्यांवर नवे सिग्नल्स बसवण्यात आले आहे. जुन्या सिग्नल्समध्ये फक्त लाल पिवळा व हिरवा असे तीन रंग दिसायचे. या नव्या सिग्नल्समध्ये तो किती वेळ राहणार आहे. याचे काऊंट डाऊन टायमिंग सेंकदांमध्ये दिसते. या सिग्नल्सला चौकांमधील चार रस्त्यांवरचे कॅमेर जोडलेले आहेत. हे कॅमेरे त्या रस्त्यावर थांबून राहिलेल्या वाहनांबाबत सिग्नलला त्यांना बसवलेल्या सेन्सर्सद्वारे कळवतात. त्यानुसार सिग्नल्समधील दिव्यांची वेळ बदलत राहते. वाहने नसतानाही एखाद्या रस्त्यावरची वाहतूक अडून राहू नये यासाठी म्हणून ही नवी रचना सिग्नल्समध्ये करण्यात आली आहे.
हे सिग्नल्स बसवण्याआधी पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी अनेक ठिकाणी स्वतंत्र सिग्नल्सच नव्हते. आता ते आहेत, मात्र त्यासाठी फक्त ५ सेकंद देण्यात आले आहेत. ५ सेकंदात रस्ता ओलांडणे अशक्य आहे असे स्वयंसेवी संस्थांचे म्हणणे आहे. आयआरसी च्या नियमांमध्ये रस्ता ओलांडण्यासाठी किमान १५ सेकंद देण्याची गरज आहे. रस्त्याची रुंदी किती मीटर आहे, त्यावर रस्ता पायी ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल याचे कोष्टक आयआरसीने तयार केले आहे. तो वेळ व त्यात अधिक ७ सेंकद असा नियमच आहे. त्याला शहरातील या नव्या सिग्नल्समध्ये हरताळ फासण्यात आला आहे.
साधारण १२५ चौकांमध्ये असे सिग्नल्स बसवण्यात येणार होते असे महापालिकेने जाहीर केले होते. त्यापैकी १०० पेक्षा जास्त चौकांमध्ये सिग्नल्स बसवून झाले आहेत. मात्र त्यात पादचाऱ्यांचा विचारच केलेला नाही असे संघटनांचे म्हणणे आहे. सिग्नल्समधील वेळेचे प्रोग्रॅमिंग महापालिकेच्या वतीने ठेकेदार कंपनी करून देते. वाहतूक शाखेचा त्याच्याशी संबध नाही. वेळ वाढवा अशी विनंती करण्यासाठी केलेल्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना महापालिकने वाहतूक नियंत्रण करणारे पोलिस सांगतात म्हणून वेळ कमी केली जाते असे उत्तर देण्यात आले. वाहतूक पोलिस मात्र आमचा याच्याशी काही संबधच नाही असे सांगतात.
प्रसंगी न्यायालयातही दाद मागण्यात येईल
महापालिकेच्या उत्तरामुळे आम्ही वाहतूक शाखेकडे माहितीच्या अधिकारात यासंदर्भात माहिती मागितली. त्यांनी आमचा वेळ वाढवणे किंवा कमी करणे याच्याशी काही संबध नाही असे लेखी उत्तर दिले आहे. ते आता आम्ही महापालिकेला पाठवणार आहोत. पादचाऱ्यांना रस्ता ओंलाडण्यासाठी प्रमाणवेळ दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. प्रसंगी न्यायालयातही दाद मागण्यात येईल.- हर्षल अभ्यंकर,सेव्ह पुणे ट्रॅफिक मुव्हमेंट