Cyber Police: सायबर गुन्ह्यांचा शोध कसा घ्यावा? पोलिसांनाच माहित नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 01:17 PM2023-05-11T13:17:13+5:302023-05-11T13:17:59+5:30
भरती झाल्यांनतर कर्मचाऱ्यांना दुसऱ्याच्या अनुभवातून शिकणे अथवा वरिष्ठ सहकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन शिकणे हाच पर्याय
भाग्यश्री गिलडा
पुणे: सायबर तक्रारींचा ओघ दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार, आता अडीच लाखांपुढील सायबर फसवणुकीच्या तक्रारी शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात नोंदवता येणार आहेत. मात्र, सायबर गुन्ह्यांचा शोध कसा घ्यावा, यासंबंधीची माहितीच येथील अनेक कर्मचाऱ्यांना (सध्या कार्यरत असलेल्या आणि नव्याने दाखल होणाऱ्या) नाही. त्याचबराेबर पाेलिसांमध्ये संगणकासंदर्भात पुरेसे ज्ञानही नसल्याने भरती होणाऱ्या इच्छुकांची संख्या कमी आहे; पण आता अशाच कर्मचाऱ्यांकडे सायबर गुन्ह्यांचा तपास हाेणार असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर सायबर पोलिस ठाण्यात लवकरच आणखी कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे.
सायबर पोलिस ठाण्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचा तपास कसा करावा, याबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण मिळत नसल्याने सायबर गुन्हेगारांचा शोध घेणे अवघड होते. सायबर फसवणुकीसारख्या किचकट गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी सक्षम यंत्रणेची नेहमीच गरज असते. अशात अपुरे प्रशिक्षण, तसेच तपासासाठी आवश्यक असलेल्या मार्गदर्शनाचा अभाव असल्याने सायबर ठाणे कशा प्रकारे सायबर गुन्हेगारांचा छडा लावणार, हा प्रश्न पुणेकरांसमोर उभा राहतो. या पलीकडे सायबर पोलिस ठाण्यात भरती होण्यासाठी इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांनी अर्ज केला की, त्यांना लगेच पोस्टिंग मिळते. यासाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा अथवा मुलाखत होत नाही, तसेच भरती झाल्यांनतर कर्मचाऱ्यांना दुसऱ्याच्या अनुभवातून शिकणे अथवा वरिष्ठ सहकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन शिकणे हाच पर्याय असतो. त्यामुळे सध्यातरी सायबर गुन्ह्यांचा तपास रामभरोसेच होत असल्याचे दिसून येते.
सुधारित परिपत्रकामुळे वाढणार सायबर पोलिसांंचा व्याप ...
पोलिस आयुक्तालयाने काढलेल्या आधीच्या परिपत्रकात २५ लाखांपुढील गुन्हेच सायबर पोलिस ठाण्यात नोंदवता येत होते. त्यामुळे आरोपींचा शोध घेण्यासाठी पुरेसा वेळ सायबर पोलिसांना मिळत होता. मात्र, आता सुधारित परिपत्रकात सांगितल्याप्रमाणे अडीच लाखांहून अधिक रकमेच्या फसवणुकीचे सगळेच गुन्हे सायबर पोलिस ठाण्यात दाखल होणार असल्याने सायबर पोलिस ठाण्याच्या कामकाजात वाढ होणार असल्याने, त्यांच्यासमोर मोठे आवाहन उभे राहणार आहे.
सायबर गुन्ह्यांचा उलगडा होण्यास लागणार अधिक कालावधी
सायबर गुन्ह्यांचा तपास लावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अपुरे ज्ञान, प्रशिक्षणाचा अभाव आणि पुरेसे साहित्य उपलब्ध नसल्याने सायबर पोलिस ठाण्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. यामुळे गुन्ह्यांतील आरोपी निष्पन्न होण्याचा दर कमी होऊ शकते, तसेच अशा प्रकारच्या किचकट गुन्ह्यांचा शोध कसा घ्यावा, याबाबत मार्गदर्शन करणारे वरिष्ठ अधिकारी त्यांच्याकडील असलेल्या गुन्हे तपासांमध्ये व्यस्त असल्याने सहसा उपलब्ध नसल्याचे दिसून येते. त्यामुळे प्राथमिक चौकशीही पुरेशा वेगाने होत नाही.
प्रशिक्षण सगळ्याच कर्मचाऱ्यांना देणे गरजेचे
सायबर गुन्ह्यांचा तपास कसा घ्यावा, यासाठीचे प्रशिक्षण आणि वेळोवेळी तंत्रज्ञानात होणारे बदल यासाठीचे प्रशिक्षण सगळ्याच कर्मचाऱ्यांना देणे गरजेचे आहे. याचा अभाव असला, तर गुन्हेगार गुन्हे करत जातील आणि पोलिस मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत. -सायबर तज्ज्ञ
''सायबर पाेलिसात भरती हाेऊ इच्छिणाऱ्यांसाठी मुलाखत अथवा परीक्षा होत नाहीत, मात्र भरती झाल्यानंतर त्यांना त्यांचे काम व्यवस्थित करता यावे यासाठी प्रशिक्षण दिले जाते. - मिनल पाटील, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे, शिवाजीनगर''
''वरिष्ठांचे काम पाहूनच आम्ही सायबर गुन्ह्याच्या तपासाचे काम शिकताे. आम्हाला शिकण्यासाठी अशा प्रकारचे कुठलेही प्रशिक्षण दिले जात नाही.- एक पाेलिस कर्मचारी''