मोठे रस्ते आणि वळणावळणांमुळे कुठून कसे जायचे? चांदणी चौकात होतोय नागरिकांचा गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 12:50 IST2023-08-30T12:50:02+5:302023-08-30T12:50:35+5:30
पुणे महापालिकेने पुढाकार घेत येथून पाच प्रमुख रस्त्यांकडे कसे जायचे, याचे नकाशे (मॅप) तयार करण्यास सुरुवात केली

मोठे रस्ते आणि वळणावळणांमुळे कुठून कसे जायचे? चांदणी चौकात होतोय नागरिकांचा गोंधळ
पुणे : एनडीए तथा चांदणी चौकात मोठमोठे रस्ते आणि वळणावळणांमुळे कुठून कसे जायचे, याबाबत नागरिक संभ्रमात पडत आहेत. विशेषतः पादचाऱ्यांना कुठून कसे जायचे हे समजत नाही. त्यामुळे महापालिकेने पुढाकार घेत येथून पाच प्रमुख रस्त्यांकडे कसे जायचे, याचे नकाशे (मॅप) तयार करण्यास सुरुवात केली आहे.
एनडीए चौकाचे लोकार्पण केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते १२ ऑगस्ट रोजी झाले. त्यामुळे या चौकातील वाहतूककोंडी बहुतांश प्रमाणात दूर झाली आहे. मात्र, मोठमोठे रस्ते आणि वळणावळणांमुळे कुठून कसे जायचे? याबाबत नागरिक संभ्रमात पडत आहेत. त्यामुळे एनडीए चौक म्हणजे भूलभुलय्या बनल्याची चर्चाही सुरू आहे. त्यातच पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी कोणतीही सुविधा नसल्याने त्यांच्या अडचणीत भरच पडली आहे. महापालिकेतर्फे एनडीए चौकात ठिकठिकाणी कोथरूड, मुळशी, बावधन, सातारा व मुंबईकडे कसे जायचे, याचे नकाशे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार लवकरच हे नकाशे तिथे लावण्यात येतील. रस्त्यावर पादचाऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाते. त्यानुसार अन्य आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहेत.